Shivendrasinhraje Bhosale Inspection Udgir Drought Situation Pudhari
लातूर

Latur Drought | पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची शेकापूर, बेळसांगवी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी

उदगीर तालुक्यातील शेकापूर आणि जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Shivendrasinhraje Bhosale Inspection Udgir Drought Situation

उदगीर : उदगीर आणि जळकोट तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली. यावेळी उदगीर तालुक्यातील शेकापूर आणि जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात आली.

या पाहणीदरम्यान शेतीची सद्यस्थिती, पावसातील खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम यांची माहिती घेण्यात आली. पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, असे आ. बनसोडे यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित क्षेत्राची वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक आहे. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असल्याने संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

उदगीर आणि जळकोट तालुक्यांतील शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी आणि त्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यासह आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT