Udgir Babu Murder Case
उदगीर : तालुक्यातील मौजे चौंडी येथे घडलेल्या आणि लातूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या बाबू ऊर्फ सूर्यकांत यांच्या बहुचर्चित खून प्रकरणात न्यायालयाने सर्व सहा आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून संगनमत करून फिल्मी स्टाईलने खून केल्याचा आरोप असलेल्या आरोपींना संशयाचा लाभ देत अपर सत्र न्यायाधीश एन. जी. पाच्चे यांनी हा निकाल दिला. या निर्णयामुळे आरोपींच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात शुभम संजीव बिरादार, बालाजी संजीव बिरादार, केवळबाई संजीव बिरादार, कचरू जीवन डोईफोडे, विलास जीवन डोईफोडे आणि लक्ष्मण जीवन डोईफोडे यांच्याविरुद्ध वाढवणा बु. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, आरोपींनी बाबू ऊर्फ सूर्यकांत यांना शेतात गाठून त्यांच्या डोळ्यांत तिखट अथवा मिरची पावडर टाकली. त्यानंतर काठीने मारहाण करून दोरीने गळा आवळून त्यांचा खून केल्याचा आरोप होता. मृतदेह आरोपी केवळबाई हिच्या घरात नेऊन टाकून घराला बाहेरून कुलूप लावल्याचा तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना धमकावल्याचाही आरोप करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी क्रमांक १ ते ३ यांचा जामीन न्यायालयाने नाकारला होता. त्यामुळे शुभम, बालाजी आणि केवळबाई यांच्यावर न्यायालयीन कोठडीत असतानाच खटला चालला.
सरकारी पक्षाने खटला सिद्ध करण्यासाठी ११ साक्षीदार तपासले, तर बचाव पक्षाने दोन साक्षीदार तपासले. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने सरकारी साक्षीदारांच्या जबाबातील परस्परविरोधी विसंगती, घटनेच्या वेळेबाबतचा गोंधळ आणि पंचनाम्यातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदोपत्री पुराव्यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाला आरोपींविरुद्धचा खुनाचा आरोप संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करता आला नसल्याचे स्पष्ट केले. केवळ संशयाच्या आधारे शिक्षा देता येत नाही, तर दोष सिद्ध करण्यासाठी भक्कम आणि निर्विवाद पुरावा आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
जेलबंद आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्या वतीने उदगीर येथील विधिज्ञ अॅड. एस. एस. हुल्ले वायगावकर यांनी, तर आरोपी क्रमांक ४ ते ६ यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जगन्नाथ चिताडे यांनी बाजू मांडली. अॅड. ऐश्वर्या ऐ. कापसे आणि अॅड. उत्कर्ष एस. हुल्ले यांनी कायदेशीर सहकार्य केले.