चाकूर: लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर चाकूरजवळ शनिवारी (दि.२५) रात्री उशिरा सुमारे २ वाजता एक भीषण अपघात होता होता टळला. उड्डाणपुलाच्या 'झिरो पॉईंट'जवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका टेम्पोला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पो जागेवरच पलटी झाला, तर ट्रक पुलाच्या कठड्यावर आदळून त्याचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी न झाल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
नांदेडच्या व्यापाऱ्याचा लसूण घेऊन लातूरकडे जाणारा टेम्पो (जी जे २१ डब्ल्यू ५९२२) चाकूर बाह्य वळणाजवळ थांबला होता. याचवेळी नांदेडहून येणाऱ्या ट्रकने (ओ डी ११ एल २६८७) त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे जागेवर थांबलेला टेम्पो पलटी होऊन पुढे फरफटत गेला आणि ट्रक पुलाच्या कठड्यावर आदळला.
अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत टेम्पोतील लसूण रस्त्यावर पसरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप असून त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. या अपघातामुळे वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता, पण लगेचच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.