Dr Narsingh Bhikane pudhari photo
लातूर

Latur sugarcane price demand : उसाला प्रतिटन ४,२०० रुपये भाव द्या

लातूरचे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने; थकीत ऊसबिले देण्याचीही मागणी

पुढारी वृत्तसेवा

लातूर : दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, साखर कारखान्यांना करोडो रुपयांचा फायदा करून देणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये भाव द्यावा. तसेच गतवर्षीची थकीत ऊसबिले तातडीने अदा करावीत, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी केली.

मागण्यांची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अंबुलगा येथील ओंकार साखर कारखान्यासमोर आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते. गतवर्षीच्या हंगामातील उसाचे गाळप आणि त्यातून उत्पादित झालेली साखर, बगॅस, मळी व प्रेसमड यांचे प्रमाण आणि बाजारभाव यांचे आर्थिक गणित मांडत डॉ. भिकाने यांनी कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले.

कारखाना फायद्यात असतानाही गतवर्षीची ऊसबिले थकीत ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. थकीत रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी टकेनचा ऊस आणण्याऐवजी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाचे प्राधान्याने गाळप करावे. पाण्याअभावी वाळत असलेल्या उसाला प्रोग्रामचा निकष न लावता तातडीने गाळपासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

हार्वेस्टर मालकांनी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी आणि बाहेरील वजनकाट्यावर केलेले वजन तपासून ग्राह्य धरावे, असेही ते म्हणाले. या आंदोलनात ऊस दरवाढ संघर्ष समितीचे संतोष नागरगोजे, राजकुमार सस्तापुरे, शिवाजी पेटे, गजानन बोळणगे, प्रशांत पाटील, वाहेद शेख यांच्यासह मनसे, प्रहार, विविध शेतकरी संघटना आणि भारतीय किसान सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उल्हास सूर्यवंशी, सोमनाथ कलशेट्टी, सचिन बिराजदार, सूरज पटेल, महेश मसलगे, प्रदीप शेळके, विकास सूर्यवंशी, बालाजी पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT