किनगाव ( लातूर ) : गोरख भुसाळे
या चार पाच वर्षांत एसटी बसने प्रवास करणार्या नागरिकांची संख्या वाढत आहे.मात्र अहमदपूर आणि अंबाजोगाई बस डेपोच्या अनेक एसटी बस गाड्या या खिळखिळ्या झाल्या आहेत. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास किनगाव रस्त्यावर एक बस बंद पडली. नागरिकांना ही बस धक्का देऊन चालू करावी लागल्याची वेळ आली. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
महामंडळाच्या अनेक एसटी बस या जुन्या झाल्या आहेत त्यामुळे अनेक गाड्या मलमपट्टी करून सुरू करण्यात आल्याने गाड्या बंद पडणे, गाड्यातून मोठ्या प्रमाणावर काळा धूर येत येणे, गाड्या खिळखिळ्या झालेल्या अवस्थेत, अनेक गाड्यांच्या सीट व खिडक्याही अनेक ठिकाणी तुटल्याने आरामदायी गाड्या आता डोकेदुखी बनत आहेत.अनेक बसची दुरवस्था झाली आहे.
सध्याची बससेवा अहमदपूर ते अंबाजोगाई जाण्यासाठी दर अर्धा तासाला गाडी आहे तसेच किनगाव मार्गे छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, लातूर, पंढरपूर, चाळीसगाव, शिंगणापूर आशा अनेक लांबपल्याच्या बस येथून जातात. किनगाव गंगाखेड,परळी बस सेवा सुद्धा आहे. एसटी बस अनेक गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत. मोजक्याच गाड्या चांगल्या अवस्थेत आहेत तर अनेक जुन्या गाड्या असल्याने काही गाड्यांचे सीट व त्यांचे हँडल तुटलेले असून काचा निसटलेल्या आहेत.अहमदपूर आणि अंबेजोगाई डेपोने बस गाड्या बदलण्याची गरज झाली आहे. खिळखिळ्या बसमधून प्रवास केल्यावर प्रवाशी नाराज होतात तर धूर मारणार्या बस मुळे गावातील व्यापार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सोमवारी (दि.24) सकाळी 11 वाजताच्या सुमारास किनगाव गावातील रस्त्यावर एम एच 06 बी डब्ल्यू 0905 ही बस बंद पडली त्यामुळे काही वेळ प्रवाशांना ताटकळत बसावे लागले त्यानंतर गाडीला धक्का देऊन गाडी सुरू करण्याची वेळ आली आहे.या अशा बसेस बद्दल महाराष्ट्र शासन आणि महामंडळ व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून योग्य ती दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.जुन्या बसेस बदलून चांगल्या बसेस द्याव्यात अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.