Jalswarajya Project Irregularities Latur
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे लक्कड जवळगा येथील जलस्वराज्य योजनेतील कथित गैरप्रकार प्रकरणी दोषी संबंधितांवर पोलीस गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद लातूरच्या पंचायत विभागाने दिले आहेत.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद लातूर यांनी दिनांक १७ मार्च २०२६ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती शिरूर अनंतपाळ यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात ग्रामपंचायत कार्यालय लक्कड जवळगा येथील तत्कालीन जलस्वराज्य प्रकल्पाचे अध्यक्ष, सचिव तसेच संबंधित ग्रामसेवक यांच्यावर पोलीस गुन्हा नोंद करण्याची आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी यापूर्वीही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड तसेच जिल्हा परिषद कार्यालयाकडून पत्रव्यवहार झालेला होता. मात्र, अद्यापपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई न झाल्याने लक्कड जवळगा येथील रहिवासी दयानंद कुंभार यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारी प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेकडून पुन्हा एकदा स्पष्ट मार्गदर्शन देत तात्काळ पोलीस गुन्हा नोंद करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढील काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.