Latur Sarathi Sankul student facility  
लातूर

Latur Sarathi Sankul student facility |लातूरचे सारथी संकुल विद्यार्थ्यांसाठी सज्ज

बांधकाम पूर्णत्वात राज्यात आघाडी, विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उत्तद्य शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधींसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने लातूरमध्ये उभारण्यात येत असलेल्या सारथीच्या भव्य विभागीय शैक्षणिक व निवासी संकुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असून राज्यातील अशा अन्य ७ संकुलाचे बांधकाम पहाता लातूरने बांधकाम व अन्य सुविधा पूर्णत्वात आघाडी घेतली आहे. तब्बल १७२ कोटी ८६ लाख रुपयांच्या खर्चातून साकारत असलेली ही वास्तू केवळ दगड-विटांची इमारत नसून, हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे 'मानवतीर्थ' ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे तीन लाख चौरस फूट क्षेत्रावर या संकुलाची उभारणी होत आहे. लातूर धाराशिव, नांदेड आणि परनणी या चार जिल्ह्यांतील १ हजार ४० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय येथे करण्यात आली आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र १२ मजली वसतिगृहे उभारण्यात आली असून, प्रत्येकी ५२० विद्यार्थ्यांची क्षमता आहे.

एका खोलीत चार विद्यार्थ्यांची व्यवस्था, स्वतंत्र कॉट, कपाट तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृह आहे. विद्याथ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दोन मजली सुसज्ज ग्रंथालय, ई-लायब्ररी, अभ्यासिका, वाचनालय आणि प्रशिक्षण सभागृह उभारण्यात येत आहे. याशिवाय अद्ययावत उपाहारगृह, जिम, मेडिटेशन रूम, वैद्यकीय कक्ष, टीव्ही रूम, इनडोअर गेमिंग रूम आणि विश्रांती कक्ष अशा सुविधाही उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र इमारत असेल, असे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे यांनी सांगितले. या संकुलाचे, एकूण बांधकाम क्षेत्र २७ हजार १६०.७० चौरस मीटर आहे.

पर्यावरणपूरक विटा, टेराकोटा डिझाइन, नैसर्गिक प्रकाश, खेळती हवा, हरित पट्टे, सौरऊर्जा ही प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र फीडरची व्यवस्था असतानाच सौरऊर्जा सुविधाही उभारण्यात येणार आहे. सुमारे एक हजार वाहनांच्या पार्किंगची सुविधाही असेल. लातूरातील पाण्याची चणचण लक्षात घेता संकुलात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरवून भूजल पातळी राखण्यात येणार आहे. शिवाय प्रतिदिवस इमारतीतून पडणाऱ्या १ लाख ३६ हजार लिटर्स सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्यात येणार असल्याचे उपविभागिय अधिकारी राजेंद्र बिराजदार आणि सहाय्यक अभियंता सिध्दांत शिंदे यांनी सांगितले.

पुण्यातील मे. ऑकार कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बांधकाम करण्यात येत आहे. वसतिगृहासमोर विकसित होणाऱ्या उद्यानात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा तयार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता टेकाळे यांनी दिली. महाराजांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा आणि नव्या पिढीचे प्रगतीचे ध्येय यांचा संगम याच परिसरात पाहायला मिळणार आहे.

अधिकाऱ्यांची आत्मीयता

कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामासाठी घेतलेले परिश्रम, दाखवलेली आत्मीयता आणि कामाप्रती असलेली निष्ठा विशेष मावणारी आहे. या वास्तूविषयी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे भावच त्यांच्या कामावरील प्रेमाची साक्ष देतात. आपल्याच भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी दर्जेदार उभे राहत आहे, या भावनेतून ते काम करत असल्याचे जाणवते. एकंद्रीत, ही वास्तू पाहताना शासनाच्या प्रयत्नांबद्दल आणि प्रशासनाच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणारे शासन, त्यासाठी पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, प्रत्यक्ष काम करणारे कष्टकरी, नियोजन करणारे अभियंते आणि निष्ठेने जबाबदारी पार पाडणारे अधिकारी या सर्वांचे योगदान या वास्तूच्या प्रत्येक विटेत सामावलेले आहे.

लोकप्रतिनिधी अन् अधिकारी

या प्रकल्पासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष लक्ष दिले असून, आमदार अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आमदार अमित देशमुख यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रुपा राऊळ, अधिक्षक अभियंता बा.मा. थोरात यांच्याकडूनही कामाचा आढावा घेतला जात आहे. कार्यकारी अभियंता टेकाळे, त्यांच्या सहकाऱ्यांनी कामात विशेष मेहनत घेतली आहे.

विद्यार्थ्यांनीही मोल ओळखावे

या वास्तूकडे केवळ एक भव्य इमारत म्हणून पाहून चालणार नाहीं. ही विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे, त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे आणि क्षमतांना नवे क्षितिज पुरवणारे एक प्रकारचे मानवतीर्थ आहे. या वास्तूचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या सुविधांचे मोल ओळखले पाहिजे. आपल्यासाठी शासनाने, समाजाने आणि असंख्य हातांनी केलेल्या योगदानाची आणीव ठेवून त्यांनी अभ्यास केला पाहिजे. येथे घालवलेला प्रत्येक क्षण स्वतःचे भविष्य घडवणारा असला तरी त्यातून देशाच्या प्रगतीला आणि सन्मानाला हातभार लागणार आहे, याचे मानही त्यांनी ठेवले पाहिजे. कारण वास्तू कितीही भव्य असली तरी तिचे खरे वैभव तेथे घडणाऱ्या माणसांमुळेच निर्माण होते ना.

अधिकाऱ्यांची आत्मीयता

कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामासाठी घेतलेले परिश्रम, दाखवलेली आत्मीयता आणि कामाप्रती असलेली निष्ठा विशेष मावणारी आहे. या वास्तूविषयी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे भावच त्यांच्या कामावरील प्रेमाची साक्ष देतात. आपल्याच भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी दर्जेदार उभे राहत आहे, या भावनेतून ते काम करत असल्याचे जाणवते. एकंद्रीत, ही वास्तू पाहताना शासनाच्या प्रयत्नांबद्दल आणि प्रशासनाच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणारे शासन, त्यासाठी पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, प्रत्यक्ष काम करणारे कष्टकरी, नियोजन करणारे अभियंते आणि निष्ठेने जबाबदारी पार पाडणारे अधिकारी या सर्वांचे योगदान या वास्तूच्या प्रत्येक विटेत सामावलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT