लातूर

Latur Railway Station Problems | लातूररोड रेल्वे स्टेशनला अनेक समस्यांनी ग्रासले

शौचालये कुलूपबंद; प्रवाशांत संताप, लक्ष देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : तालुक्यातील लातूर रोड रेल्वे स्टेशनवर कुठल्याच सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे लातूररोड स्टेशनला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या प्रकरणी प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या समस्या सोडविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लातूर रोड हे चाकूर तालुक्यातील मोठे रेल्वे जंक्शन आहे. या ठिकाणपासून जवळच चाकूर येथे सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जवान प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांना रेल्वे हा मोठा पर्याय आहे. या स्टेशनवरून भारताच्या कानकोपऱ्यात रेल्वे पोहचते. परंतु या रेल्वेस्टेशनवर मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या स्टेशनवर महिला व पुरुषांसाठी असलेली शौचालये अनेक दिवसांपासून कुलूपबंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे. रेल्वे स्टेशनवरील कोच पोजीशन दर्शविणारी यंत्रणा बंद असल्यामुळे रेल्वे येताच प्रवाशांची मोठी धावपळ उडते. रेल्वे कोणत्या प्लॉट फॉर्मवर येणार आहे याची माहिती मिळते परंतु, आपला डब्बा पुढे येणार आहे की, पाठीमागे याची योग्य माहिती मिळत नसल्याने अनेकांना चुकीच्या ठिकाणी उभे राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे.

लातूररोड रेल्वे स्टेशनंवर तात्काळ तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली काही दलाल सक्रिय झाल्याचीही चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे.तात्काळ तिकिटासाठी रात्रभर नंबर लावूनही सकाळी तात्काळ तिकीट दलालाच्या माध्यमातून दुसऱ्यांनाच दिले जाते. त्यामुळे सामान्य माणसांना याचा नाहक त्रास होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन पूर्णपणे डोळेझाकपणा करीत आहे.

प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी आवश्यक एकच मोठी सीडी उपलब्ध आहे. त्या सीडीच्या पायऱ्या चढ उतार करण्यास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाना अडचण होत आहे. यासाठी लिफ्ट किंवा एक्सलेटरच्या सुविधांचा अभाव असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लातूर रोड स्टेशनवरून दररोज अनेक रेल्वे धावतात. येथून विविध महत्त्वाच्या शहरांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. शिर्डी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेंगलोर, हैद्राबाद, तिरुपती, नांदेड छत्रपती संभाजीनगर, मनमाड अशा विविध भागात रेल्वे धावते. तरीही स्टेशनवरील सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याने प्रवाशांत संताप वाढत आहे.

चौकशी काउंटर उपलब्ध नसल्यामुळे रेल्वे गाड्यांची विचारपूस करणे फार जिकिरीचे जात आहे. कोणीही रेल्वे कर्मचारी रेल्वे संदर्भात माहिती देत नाहीत. तिकीट काउंटरवर माहिती दिली जात नाही. त्याचा नाहक त्रास सीमा सुरक्षा दलातील प्रशिक्षणार्थी, सामान्य प्रवाशांना होत आहे. पूर्वी अंधाराचा फायदा घेऊन रेल्वेस्थानक परिसरात चोऱ्याचे प्रमाण वाढले होते. रेल्वे स्थानकात कॅमेरे बसविल्यामुळे ते प्रकार थांबलेत. परंतु रात्रीसाठी अधिक रेल्वे पोलिसांची मागणी होत आहे. या सर्व समस्यांकडे संबंधित रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या प्रश्नाकडे लक्ष घालून प्रवाशांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लातूर रेल्वे स्टेशनवरून दुसरीकडे गाडी, काही महत्वाच्या वस्तू आणि आवश्यक साधने पाठविले जाण्यासाठी पार्सलची सुविधा उपलब्ध नाही. ही सुविधा प्रत्येक रेल्वे स्टेशनंवर असणे आवश्यक आहे. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण कधी दूर होईल ते न बोललेलं बरे.

खासदार डॉ. काळगे यांचे दर्शन दुर्लभ

लातूर रोड रेल्वेस्टेशनवर अनेक समस्या निर्माण झाल्या असून या रेल्वे स्टेशनंवर कुठल्याच सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने या स्टेशनच्या विकासाकडे खासदार डॉ शिवाजी काळगे यांनी अधिक लक्ष पुरविण्याची गरज आहे. चाकूर तालुक्याकडे खासदाराचे दर्शन दुर्लभ होत असल्याची भावना नागरिक, प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT