Latur Rain: July ends; no sign of rain, farmers worried
ज्ञानेश्वर भंडारे
देवणी : जुलै महिना संपत आला तरी देवणी तालुक्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आकाशात ढगांची वर्दळ असली तरी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. ऊस, सोयाबीनसह विविध पिकांवर पाण्याअभावी संकट ओढावले असून अनेक भागांतील ओढे, नाले, तलाव आणि नदीपात्रे कोरडी पडली आहेत. परिणामी शेतकऱ्यांसह पशुपक्ष्यांनाही पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थितीही गंभीर बनली आहे. अनेक शेतांमध्ये उगवण कमी झाली असून उगवलेली पिकेही ओलाव्याअभावी सुकत आहेत. पेरणीवर झालेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, पाऊस आणखी लांबल्यास पुन्हा पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील ओढे, नाले, तलाव आणि लहान नद्या कोरड्या पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना विहिरी किंवा टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून भूजल पातळीही झपाट्याने खालावत आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास खरीप हंगाम पूर्णपणे संकटात येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने तातडीने पीक पाहणी करून पंचनामे करावेत, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच आवश्यक आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
उसाची वाढ खुंटली
वेळेवर पाऊस न झाल्याने उसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. जुलै अखेर उसाची उंची अवधी दीड ते दोन फूट असून पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी उसाची पाने पिवळी पडू लागली असून पीक करपण्याच्या मार्गावर आहे.