Crime News pudhari photo
लातूर

Latur Crime : १४ लाखांच्या सोने चोरीचा उलगडा; जनावरे चोरीचाही प्रयत्न हाणून पाडला

लातूर येथील विवेकानंद चौक पोलिसांची कौतुकास्पद दुहेरी कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

लातूर : विवेकानंद चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन महत्त्वपूर्ण कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या. एका प्रकरणात १४ लाखांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करून महिला आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात चोरीस नेण्यात आलेले तीन बैल शोधून काढले.

एलआयसी कॉलनी परिसरातील एका घरातून अज्ञात चोरट्याने अंदाजे ९ तोळे ९ ग्रॅम वजनाचे, सुमारे १४ लाख ४८ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेली होती. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजितसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.

गुप्त माहितीदारांकडून मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि शास्त्रीय तपासाच्या आधारे पोलिसांनी शामल मोहन राठोड (वय ४०, रा. कन्हेरी तांडा, लातूर) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली.

तिच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ९ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सुमारे १३ लाख ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.दरम्यान, दुसऱ्या घटनेत सारोळा येथील शेतकरी विभीषण संपती बनसोडे यांच्या शेतातून मध्यरात्री तीन बैल चोरीस नेण्यात आले होते. बैलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर शेतकऱ्याने डायल ११२ वर संपर्क साधला.

माहिती मिळताच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार त्रिंबकेश्वर अनिल विरकर आणि दीपक आबाजी सोनकांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरात शोधमोहीम सुरू केली.रात्रीच्या अंधारात शेतशिवार, बांध आणि रस्त्यांवर कसून शोध घेतल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील एका शेताच्या बांधावर तीनही बैल बांधून ठेवलेले आढळून आले.

पोलिसांनी बैलांची ओळख पटवून ते शेतकरी विभीषण बनसोडे यांच्या ताब्यात दिले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान टळले.या दोन्ही कारवायांमधून विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सतर्कता, तत्परता आणि कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे. सहाय्यक फौजदार आर. एन. गोंदकर तसेच पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, राणवीर देशमुख, योगेश गायकवाड, सचिन राठोड, त्रिंबकेश्वर विरकर आणि दीपक सोनकांबळे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT