Mobile  Pudhari
लातूर

Latur Police Return Mobiles-हरवलेला मोबाईल पुन्हा मालकाच्या हाती; लातूर पोलिसांकडून १७१ मोबाईल परत

हरवलेला मोबाईल पुन्हा मालकाच्या हाती; लातूर पोलिसांकडून १७१ मोबाईल परत

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा : हरवलेला मोबाईल परत मिळणे ही अनेकांसाठी केवळ वस्तू मिळण्याची बाब नसून त्याच्याशी जोडलेल्या महत्त्वाच्या माहितीची आणि आठवणींचीही सुरक्षितता असते. हीच बाब लक्षात घेऊन लातूर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १७१ हरवलेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात यश मिळविले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात एकाच दिवशी ही लोकाभिमुख मोहीम राबविण्यात आली.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बँकिंग व्यवहार, ऑनलाइन पेमेंट, शासकीय कामकाज, शिक्षण, आरोग्य सेवा तसेच वैयक्तिक माहिती यामुळे मोबाईल हरवल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन ते लवकरात लवकर संबंधित मालकांना परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा सायबर सेल, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि सर्व पोलिस ठाण्यांनी सीईआयआर पोर्टल तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणालींचा वापर करून विशेष मोहीम राबविली.

या मोहिमेत लातूरसह इतर जिल्ह्यांतून शोधण्यात आलेले १७१ मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी (३० जून) संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते काही मोबाईल वितरित करण्यात आले, तर उर्वरित मोबाईल संबंधित पोलिस ठाण्यांमार्फत मालकांना सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी लातूर पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

लातूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल हरवल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि सीईआयआर पोर्टलवर मोबाईल ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या सेवेसाठी लोकाभिमुख उपक्रमांना भविष्यातही सातत्याने प्राधान्य दिले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिस ठाणेनिहाय परत केलेले मोबाईल

शिवाजीनगर २४, गांधी चौक २३, उदगीर शहर २१, एमआयडीसी १६ आणि मुरूड १५.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT