लातूर : हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याचा आनंद आणि पोलिसांच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता, असा अनुभव लातूरमधील ३४ नागरिकांना आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या महिनाभरात ३४ हरवलेले मोबाईल शोधून काढले. हे सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक कौशल्य आणि नियोजनबद्ध तपासाच्या जोरावर विविध ठिकाणांहून ३४ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.शोधून काढलेले मोबाईल संबंधित नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून परत करण्यात आले.
हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे आणि शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक संतोष ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार लक्ष्मण कांदे, नारायण शिंदे, परमेश्वर अंकुलगे, किशोर माने आणि जब्बार पटवारी यांनी केली.
हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या सुरक्षितपणे मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या या कामगिरीमुळे नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे.