Sandalwood Timber Seizure Chakur Latur
चाकूर : तालुक्यातील चापोली ते नायगाव मार्गावरील आनंदवाडी शिवारात चाकूर पोलिसांनी कारवाई करीत ११ लाख ७० हजार रुपये किमतीचा चंदनाचा मुद्देमाल जप्त केला. चंदनाच्या वृक्षांची अवैध तोडणी करून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चापोली ते नायगाव रस्त्यालगत असलेल्या आनंदवाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली. नरसिंग रामा बंदराळे (वय ५०, रा. आनंदवाडी, ता. चाकूर), वसंत भानुदास चांनकाणे (वय ४०), संतोष वैजनाथ चांनकाणे (वय ३५) आणि बालाजी भानुदास चांनकाणे (वय ४२, तिघेही रा. वाढवणा, ता. उदगीर) यांनी संगनमत करून शासनाने संरक्षित केलेल्या चंदनाच्या वृक्षांची अवैधरीत्या तोडणी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चंदनाच्या लाकडाची साल काढून तयार केलेला गाभा, चंदनाच्या ढीलप्या भरलेली पोती तसेच चंदनाची तोडणी आणि प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, त्याची एकूण किंमत ११ लाख ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल श्रीरामे यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. एन. चामले पुढील तपास करीत आहेत.