लातूर : लातूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन सराईत दुचाकी चोरांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथकांनी ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत बरकत नगर, लातूर येथे सापळा रचून तोहित ऊर्फ तोह्या अकबर पठाण (वय २५, रा. हणमंतवाडी, कव्हा नाका, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने लातूर शहरातून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यातआल्या. यामुळे गांधी चौक, उदगीर शहर तसेच पुणे शहरातील प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला. दुसऱ्या कारवाईत मळवटी रोड, लातूर येथे छापा टाकून अमोल तेजराव नागरवाड (वय २६, रा. थोरलेवाडी, ता. अहमदपूर) याला पाच चोरीच्या दुचाकींसह अटक करण्यात आली.
त्याने लातूर, निलंगा, गांधी चौक, विवेकानंद चौक तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.जप्त वाहनांमध्ये होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो पॅशन, बजाज पल्सर आणि होंडा अॅक्टिव्हा यांचा समावेश आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन स्वतंत्र पथकांनी केली.