लातूर शहरात डिझेल व पेट्रोलसाठी सर्वच पंपांवर अशी गर्दी उसळली होती. तीव्र उन्हातही पेट्रोल- डिझेल भरण्यासाठी अशा लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक पंपांवर इंधन उपलब्ध नव्हते. जिल्ह्यासह परजिल्हे व परराज्यांतील वाहनेही या रांगेत होती. प्रखर ऊन अंगावर घेत वाहनधारक ताटकळत उभे होते. यात मुली, महिला व ज्येष्ठ नागरकांचाही समावेश होता. पुरवठा असताना अशी टंचाई का झाली? की करण्यात आली? याची दखल प्रभारी जिल्हाधिकारी राहुलकुमार मीना यांनी घेतली व कृत्रिम टंचाई करणाऱ्या तसेच इंधन असूनही ते न देणाऱ्या पंपचालकांवर आर्थिक दंडाबरोबर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान गॅसप्रमाणे पेट्रोल-डिझेलचेही दर वाढतील या उद्देशाने पपचालकांनीच अशी कृत्रिम इंधन टंचाई तसेच साठेबाजी केली असावी अशाही चर्चा काल दिवसभर शहरात सुरू होत्या. pudhari photo
लातूर

Fuel crisis complaint : पेट्रोलची साठेबाजी; कृत्रिम टंचाई कराल तर फौजदारी गुन्हे

लातूर : पंपचालकांना प्र. जिल्हाधिकारी राहुलकुमार मीना यांनी बजावले; आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही, काही पेट्रोल पंप चालकांकडून विनाकारण पंप बंद ठेवले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. ग्राहकांना इंधन नाकारून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा हा प्रकार सार्वजनिक हिताला बाधा आणणारा असून, याची गंभीर दखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मिना यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यांनी जिल्ह्यातील पेट्रोलपंप धारकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून याबाबत सूचना दिल्या आहेत.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह पेट्रोलपंप चालक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.पेट्रोलपंप चालकांनी साठा उपलब्ध असताना कोणत्याही परिस्थितीत विक्री बंद ठेवू नये. तसेच ग्राहकांना इंधन देण्यास कोणत्याही परिस्थितीत नकार देऊ नये. इंधनाची मर्यादित विक्री करणे किंवा कारणाशिवाय अडथळे निर्माण करणे टाळावे. शासनाने ठरवून दिलेल्या विहित वेळेत पंप नियमित सुरू ठेवावेत.

पंपावर दर्शनी भागात इंधनाचे दर स्पष्टपणे दिसतील असे फलक लावावेत. स्टॉक आणि विक्रीची नोंद रोजच्या रोज अपडेट असावी आणि तपासणी अधिकाऱ्यांना सर्व नोंदवह्या उपलब्ध करून द्याव्यात. साठा लपविणे किंवा मुद्दाम टंचाई निर्माण करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाईल. पंपावर सीसीटीव्ही प्रणाली 24 तास कार्यरत असावी आणि त्याचे रेकॉर्ड प्रशासनास उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना सर्व पेट्रोलपंप चालकांना यावेळी देण्यात आल्या.

तालुकास्तरावर विशेष पथके

तालुकास्तरावर विशेष पथके गठीत करण्याचे आले आहेत. यामध्ये पथक प्रमुख म्हणून संबंधित पुरवठा निरीक्षण अधिकारी, सहायक पथक प्रमुख म्हणून संबंधित पुरवठा निरीक्षक किंवा सहायक महसूल अधिकारी आणि सदस्य म्हणून संबंधित पुरवठा विभागाचे लिपिक-टंकलेखक यांचा समावेश करण्यात आला आहे. ही पथके आपापल्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करतील.तपासणी दरम्यान जर एखादा पेट्रोल पंप चालक दोषी आढळला, तर त्यांच्यावर केवळ आर्थिक दंडच नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT