NEET UG Re Exam 2026 pudhari photo
लातूर

NEET result 2026 : री नीटमध्येही लातूर पॅटर्न ठरला नंबर वन; मेहनत रंगली

जिल्ह्यातील सुमारे १८०० विद्यार्थी विविध वैद्यकीय प्रवेशास पात्र होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

लातूर : अथक मेहनत, निर्मळ निष्ठा अन् प्रचंड समर्पणातून लातूर पॅटर्न साकारला आहे. कितीही वादळे आली तरी हा वृक्ष ढळणार नाही. कोणी जाळण्याचा प्रयत्न केला तरीही तो जळणार नाही उजळून निघेल यावर आमचा केवळ विश्वासच नाही तर त्याची खात्रीही आहे कारण लातूर पॅटर्न हे बावन्नकशी सोने आहे, असा विश्वास लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नीट पेपरफुटीनंतर व्यक्त केला होता.

नीट-यूजी २०२६ च्या या निकालाने खरा ठरला आहे. या निकालाने पुन्हा एकदा लातूर पॅटर्न'ची ताकद सिद्ध झालीआहे. पेपरफुटीच्या वादानंतरही लातूरमधील विद्यार्थ्यांनी देशपातळीवर दमदार कामगिरी करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली. जिल्ह्यातील प्रमुख कोचिंग संस्था व कनिष्ठ महाविद्यालयांच्या निकालावरून यंदा सुमारे १८०० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नेहमीप्रमाणे राजर्षी शाहू महाविद्यालयाने यंदाही आघाडी कायम ठेवली. महाविद्यालयातील १२५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून सायंकाळपर्यंत ९०० विद्यार्थ्यांचे निकाल उपलब्ध झाले होते. त्यामध्ये ६८३ गुणांचा विद्यार्थी प्रथम ठरला. ६५० पेक्षा अधिक गुण मिळवणारे ९, ६०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे ५५ आणि ५५० पेक्षा अधिक गुण मिळवणारे १५३ विद्यार्थी आहेत.

संपूर्ण निकालानंतर ही संख्या वाढेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी व्यक्त केला. यंदा सुमारे ८०० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरतील, तर त्यापैकी ५०० विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.दयानंद विज्ञान महाविद्यालयानेही यशाची परंपरा कायम ठेवली.

वेदांत पाटील (५९५ गुण) प्रथम, शिवम तिवारी (५५५ गुण) द्वितीय आणि आयुष गावंड (५४८ गुण) तृतीय आले. ५०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे १० विद्यार्थी असून वेदांतपाटीलने जीवशास्त्र विषयात ३६० पैकी ३५६ गुण मिळवले. महाविद्यालयातील ३९० विद्यार्थ्यांपैकी ३०४ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

आरसीसीचे लक्षवेधी यश

प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसीकडे उभ्या देशाचे लक्ष होते. त्यांनीही निकालात बाजी मारल्याचे सांगितले आहे. कृष्णा भागवत जाधव या विद्यार्थ्याने ६८६ गुण मिळवत १७२ असा ऑल इंडिया रँक मिळवला आहे. सायंकाळी सातपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ६०० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ होती, असा दावा आरसीसीच्या वतीने करण्यात आला आहे.

विद्या आराधनाची यशोभरारी उज्जवल

येथील विद्या आराधना अकॅडमीच्या १२०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. २०२५ पेक्षाही यावर्षीचा निकाल गुणात्मक दृष्टीने अतिशय समाधान देणारा अन लातूरच्या गुणवत्तेची भरारी देशव्यापी करणारा आहे. २००५ च्या तुलनेत या वर्षीच्या निकालात सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. ६६६ गुण मि‌ळवून श्रावणी राम कदम ही विद्यार्थीनी प्रथम आली आहे. ६० गुणांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ९ विद्यार्थी, ५५० पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे १०० तर ५०० गुण मिळवणारे २५० विद्यार्थी आहेत. आमच्या अकॅडमीचे ३५० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरतील यातील २५० विद्यार्थी एमबीबीएससाठी असतील. यातून किमान १२ विद्यार्थ्यांना एम्सला प्रवेश मिळेल असा विश्वास या अकॅडमीचे संचालक डॉ. सतीश पवार व संजय लड्डा यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT