

तासगाव शहर : तासगाव येथील डॉ. ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेजमध्ये अतिरिक्त फीसाठी मानसिक छळ केला जात असून, विविध गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. या आंदोलनाला वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनने पाठिंबा दिला आहे.
निवेदनानुसार, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरप्रकार सुरू आहेत. वार्षिक शैक्षणिक शुल्क ५४ हजार रुपये असताना ८० हजार रुपयांची मागणी केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयात नियमित अध्यापन होत नसून प्राध्यापकांऐवजी लिपिकांकडून शिकवले जात आहे. तसेच नर्सिंग शिक्षणासाठी आवश्यक प्रयोगशाळा आणि वर्गखोल्या उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून अभ्यासभेटींचे कोणतेही नियोजन केले जात नाही. दुसरे वर्ष संपत आले तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. आता परीक्षा अर्ज भरताना अतिरिक्त पैशांसाठी अडवणूक केली जात असल्यामुळे शासनाने आमची अन्य महाविद्यालयात प्रवेशाची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
याबाबत एका विद्यार्थिनीचे पती अजित पाटील म्हणाले, माझी पत्नी या महाविद्यालयात शिकत आहे. परीक्षा शुल्काबाबत विचारणा केली असता अडीच हजार रुपये सांगून प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त रकमेची मागणी करण्यात आली. पैसे नसतील तर महाविद्यालय सोडा, असे सांगण्यात आले. शिवाय महाविद्यालय सोडण्यासाठी तिप्पट रक्कम भरण्याची अट घातली जात आहे.
विद्यार्थिनी दीपिका पाटील म्हणाल्या, घरापासून जवळ असल्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेतला; मात्र आमची फसवणूक झाली आहे. येथे सतत पैशांची मागणी करून मानसिक छळ केला जातो. पहिल्या वर्षाचा निकालही अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्हाला येथे शिकायचे नसून पर्यायी महाविद्यालयात प्रवेश मिळावा.