Nilanga taluka Crop damage
निलंगा : निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच, सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचीही मोठी धावपळ उडाली.
सध्या तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि ज्वारीची कापणी करून धान्य शेतातच वाळत घातले आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे हे धान्य भिजल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर (तोर) गळून पडला असून, भाजीपाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे निलंगा शहरातील मुख्य बाजारपेठेत विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली. उघड्यावर माल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे, भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाल्यांचे यामुळे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या सरींमुळे रस्त्यावरील नागरिकांना आडोसा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.
हवामानातील सततच्या बदलामुळे पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी आपल्या कापणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी आणि पिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.