निलंगा : पुढारी वृत्तसेवा : निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेत जमिनीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून भावाभावांमध्ये वाद होते. अखेर शेतीची भांडणावरुन दोघांना जिवाशी मुकावे लागले आहे. गुरुवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ज्या शेतीवरुन भांडणे होती त्याच शेत जमिनीवर ही दुर्दैवी घटना घडली. (Latur Murder Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, मृत सुरेश आणेप्पा बिराजदार यांचा व त्यांचे सख्खे भाऊ बसवराज आणेप्पा बिराजदार, सुनील आणेप्पा बिराजदार, लखन आणेप्पा बिराजदार यांचा गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या वाटणीवरुन वाद चालू होता. यावरुन एकमेकांविरोधात गुन्हे ही दाखल झाले होते. सातत्याने भांडणे होत असल्याने गावातील अनेक जणांनी त्या सर्व भावडांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. (Latur Murder Case)
गुरुवारी (दि. १६) मृत सुरेश बिराजदार व त्यांची गणेश व साहील ही मुले शेतात काम करीत होती. दरम्यान, आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार, लखन बिराजदार यांनी संगणमत करुन अचानक लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. बेसावध असणाऱ्या या बाप-लेकांना सावध होण्यास वेळही मिळाला नाही. तिघा भावांनी केलेल्या जबर मारहाणीत सुरेश बिराजदार (५०) व त्यांचा मुलगा साहिल (२२) यांचा मृत्यू झाला. (Latur Murder Case)
दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला असून ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी इतरत्र नेण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती समजताच उपनिरीक्षक अजय पाटील, पोलीस अमित गायकवाड, ज्ञानोबा शिरसाट, राजू हिंगमिरे, बळीराम म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांना ताब्यात घेतले. कासार शिरसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सहायक पोलीस निरीक्षक राठोड म्हणाले की, शेतीच्या वादातून ही घटना घडली आहे. यात बाप-लेकाचा मृत्यू आहे. या प्रकरणी आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार व लखन बिराजदार यांना घटनेनंतर तासाभरातच अटक केली आहे. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.