चाकूर : कर्जाची नोंद स्थावर मालमत्तेवर घेण्यासाठी साडेपाच हजाराची लाच घेताना तालुक्यातील रायवाडी येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१३) रंगेहाथ अटक केली. निवृत्ती तुकाराम आलापुरे (वय ३६) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी किनगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, ग्रामपंचायत कार्यालय रायवाडी येथील ग्रामसेवक निवृत्ती आलापुरे यांनी मौजे रायवाडी येथील तक्रारदार याने पत्नीचे नावाचे राहते घर तारण ठेवून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे १५ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जाची नोंद स्थावर मालमत्तेवर घेण्यासाठी ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांना ७५०० रूपये रकमेची मागणी केली होती. तडजोडी अंती ६५०० रुपये स्वीकारण्याचे मान्य करून त्यापैकी १ हजार रुपये यापूर्वी स्वीकारले होते. उरलेले ५ हजार ५०० रुपये मागणी केली असता सदर रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांची खात्री झाल्याने तक्रारदार यांनी लातूर येथील लाच लुचपत विभागात लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचून लाचलुचपत विभागाने सोमवारी (दि.१३) सापळा रचून ग्रामसेवकाला शासकीय पंचासमक्ष लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या पथकाने केली.