निलंगा येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. Pudhari
लातूर

Nilanga Congress Protest | निलंग्यात गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

सामान्य नागरिक, महिला आणि कुटुंबे आर्थिक अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

Latur Gas Price Hike News

निलंगा : केंद्र सरकारकडून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वारंवार वाढ केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान अधिकच कठीण झाले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक, महिला आणि कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली असताना गॅस दरवाढ हा त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार ठरत असल्याचा आरोप करत निलंगा येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या सूचनेनुसार निलंगा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या बाजारपेठेत एलपीजी गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, बाजारपेठेत निर्माण झालेला सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा दूर करावा आणि नागरिकांना गॅस सिलेंडर सहज व नियमित उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनात तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक अजित नाईकवाडे, नगरसेवक डॉ. गजेंद्र तरंगे, सिराज देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शाहीद पटेल, प्रमोद मरुरे, पंचायत समिती सदस्य किरण पाटील, अभिजित उसनाळे, बालाजी गोमसाळे, माधवराव पाटील, विठ्ठल पाटील, अजगर अन्सारी, महेश देशमुख, प्रशांत वांजरवाडे, राजप्पा वारद, तुषार सोमवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT