Congress Abhay Salunke roadblock agitation
निलंगा : मागच्या एक महिन्यापासून दररोजच्या मुसळधार पाऊस अन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मातीसह पिक वाहून जाऊन जमीनी नापिक बनल्या आहेत. अशा परिस्थितीत खचून गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तुटपुंजी मदत देण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केली.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजपचे गुत्तेदार कार्यकर्ते शेतकरी म्हणून उभा करुन निलंग्याच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केल्याची टीका साळुंके यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही असेही त्यांनी सांगितले.
निलंगा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण लातूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनात अभय साळुंके बोलत होते.
खरीप हंगामातील पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असतानाही प्रति हेक्टर 8500 रुपये एनडीआरएफच्या नावाखाली सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम केले आहे. निवडणुकीच्या आगोदर एनडीआरएफच्या नियमात बदल करुन हेक्टरी 13600 रुपये मदत तीन हेक्टर पर्यंत जाहीर करण्यात आली होती. आता यांच्या निवडणूका संपताच एनडीआरएफचे नियम बदलून मदत दोन हेक्टर पर्यंत 8500 करण्यात आली. एक एकर सोयाबीन काढणीसाठी मंजूर 8000 हजार रुपये घेत आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये एक एकर सोयाबीनही शेताच्या बाहेर निघणार नसल्याने जाहीर केलेल्या मदतीचा निषेध करत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन किमान एक लाख रुपये हेक्टरी मदत, मनुष्यहानी झालेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत द्यावी, अतिवृष्टीत वाहून गेलेले रस्ते व पूल तात्काळ दुरुस्त करावेत, गतवर्षी फुटलेले मसलगा मध्यम प्रकल्प व हाडगा लघू प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावावे आदी मागण्या करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांनी औराद शहाजानी येथे पाहणी दौरा केला. त्या दौऱ्यात शेतकऱ्यांना बोलू न देता भाजपचे कार्यकर्ते शेतकरी म्हणून उभा करण्यात आले. खऱ्या शेतकऱ्यांची यांना भीती वाटते का? असा प्रश्न उपस्थित करत औराद शहाजानी येथील महिला सरपंच निवेदन देण्यासाठी आल्या होत्या त्यांना भेटू दिले नाही या घटनेचा अभय साळुंके यांनी निषेध करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस कायम लढत राहील असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला. जवळपास दोन तासाच्या रास्तारोको आंदोलानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, अजित माने, हमीद शेख, पंकज शेळके, अजित नाईकवाडे, विठ्ठल पाटील, अॅड नारायण सोमवंशी, बालाजी गोमसाळे, महेश देशमुख, शकील पटेल, विठ्ठल पाटील, रमेश मदरसे, अॅड संदीप मोरे, अॅड तिरुपती शिंदे, मुजीब सौदागर, मदन बिरादार, गंगाधर चव्हाण, शाहीद लाला पटेल, विकास पाटील, दिनकर निटुरे, सिराज देशमुख, अजगर अन्सारी, किशोर कारखाने, दत्ता जाधव, हभप संदीपान महाराज वाघमारे, धनाजी चांदूरे, अपराजित मरगणे, माधवराव पाटील, हाजी सराफ, पद्मसिंह पाटील, किरण पाटील, गिरीश पात्रे आदी उपस्थित होते.