Latur News: Riverbank lands washed away by rains
जळकोट, पुढारी वृतसेवाः 22 जून रोजी झालेल्या अतिवृष्टीसदृश्य मुसळधार पावसामुळे जळकोट शहरात असलेल्या परट होळ नदीकाठची शेकडो एकर जमिन खरडून गेली आहे. शेतात दगड मातीचा खच साचल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
जळकोट येथील परट होळ नदीकाठी असलेल्या जुलैखाबी खलील तांबोळी, हिदायतुल्ला इब्राहिम तांबोळी, शिवराज बनसोडे, विजय बनसोडे, बालाजी बनसोडे आदी शेतक-यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत.
याच नदीजवळील वंजे परिवाराची जमीन, तुकाराम शिंदे, नामदेव शिंदे, सगुनाबाई शिंदे, भागवत शिंदे यांच्या जमिनीही खरडून गेल्या आहेत. तसेच जळकोट शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कृषी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर वीज कोसळल्याने सदर इमारत उद्धस्त झाली आहे. रात्री आठ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडल्याने शेतालाच नदीचे स्वरूप आले होते.
आहे शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने व दगड मातीचा खच साचल्याने आता शेतकऱ्यांना पेरणी करणे अशक्य झाले आहे. शहर व तालुक्यातील नदीकाठच्या नुकसान झालेल्या जमिनीचे सर्वे करून पंचनामे करण्यात यावेत व आपद्ग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, खते व बियाणे वाटप करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नागेश्वरी केंद्रे, शांताबाई लक्ष्मणराव आदावळे, पंचायत समिती सभापती सुनिता कोसंबे, उपसभापती माधव वाघमारे, सोमेश्वर सोप्पा, बाजार समितीचे संचालक महेताब बेग, युवा नेते सचिन केंद्रे, अक्षय बडगिरे, प्रमोद घाडगे आदींसह सर्व शेतकऱ्यांनी केली असून पालकमंत्री शिवेद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनास पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.