Latur News: Resolve the water crisis across three districts by bringing water from the Ujani Dam to the Manjara Dam
लातूर, पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणातील पाणी मांजरा धरणात आणण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव २२ वर्षांपूर्वी झाला असून, भूमिपूजन होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. शासनाने या प्रकल्पाला गती देऊन उजनीचे पाणी मांजरा धरणात आणावे. अशी मागणी जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी करीत यामुळे लातूरसह बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मांजरा धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा असताना साखर कारखाने आणि उद्योगांसाठी पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन अन्य वापरासाठी पाणी देणे बंद करावे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ पुन्हा कार्यान्वित करावे. वॉटरग्रिड योजनेसाठी भरीव निधी द्यावा, लातूरच्या पाणीपुरवठा योजनेला गती द्यावी.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई, थकीत पीकविमा, ऊसबिले तातडीने द्यावीत. शेतीपूरक व्यवसायांची थकबाकी माफ करावी, तसेच महाराष्ट्र राज्य शेतकरी आयोग स्थापन करावा, असेही ते म्हणाले.
याशिवाय मनरेगाच्या कामांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, लातूर, बीड व धाराशिवसाठी स्वतंत्र विभागीय आयुक्तालय स्थापन करावे, शहरातील पार्किंग, स्वच्छता, आरोग्य व शैक्षणिक सुविधा सुधाराव्यात आणि अवैध धंदे व गुन्हेगारीवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी मांडल्या. या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, बी. टी. कदम, बाबासाहेब देशमुख, राजाभाऊ मुळे, ज्योतीराम चिवडे, बब्रूवान पवार, राजेसाहेब देशमुख, राजकुमार कलमे, नितीन कोरे आदी उपस्थित होते.