शिरूर (लातूर ), शंकर भालेकर
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात राजनीति नेहमीच उलथापालथीची साक्षीदार राहिली आहे. आता माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशाने ही समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत. भाजपने सोडचिठ्ठी दिल्यानंतर धोंडे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ राजकीय पक्षांतर नसून, तीन तालुक्यांच्या सत्तासमीकरणात गाजणारा धोरणात्मक बदल ठरणार आहे.
गेल्या चार दशकांपासून आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघावर प्रभाव राखणाऱ्या धोंडे यांच्या या निर्णयाने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. कारण सध्या मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या मतभेदांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. या दोन्ही नेत्यांतील दरी वाढत असताना, धोंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपसमोर नवे आव्हान उभे केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कोणाच्या छत्राखाली उभे राहायचे, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान, धोंडे यांच्यासोबत गेलेल्या सुमारे पाचशे कार्यकर्त्यांमध्ये अनेक कट्टर मुंडे भक्त आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या अपेक्षा, स्थाननिर्धारण आणि पुढील राजकीय गणित या सर्व बाबींवर आता राष्ट्रवादी नेतृत्वाला तोल सांभाळावा लागणार आहे. तसेच पक्षातच माजी आ. बाळासाहेब आजबे व धोंडे यांच्यात समन्वय साधला जाईल का, हेही उत्सुकतेचा विषय ठरले आहे. एकूणच, धोंडे यांच्या या पक्षप्रवेशाने मतदारसंघातील समीकरणे पुन्हा कोड्याप्रमाणे गुंतली आहेत. निष्ठा आणि स्वार्थ, परंपरा आणि परिवर्तन, जुने बालेकिल्ले आणि नव्या मैत्रीचा संगम या सर्वांच्या संघर्षातून आष्टी पाटोदा-शिरूरची राजनीति नव्या दिशेने प्रवासाला निघाली आहे. आजचे चित्र पाहता एकच म्हणावीशी वाटते या मतदारसंघाचे राजकीय भविष्य अद्याप 'अनाकलनीय'च आहे!
निष्ठावान मुंडे भक्तांचे मौन
आष्टी विधानसभा मतदार संघातील बहुतांश जिल्हा परिषद गटांना आजवर भाजपचा बालेकिल्ला म्हणून संबोधले जायचे कारण येथील कार्यकर्ता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दांना प्रमाण मानून भाजपाशी एकनिष्ठने सहकार्य करायचा मात्र यावेळी स्थिती बदलली आहे मंत्री पंकजा मुंडे व आ. सुरेश धस यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने येथील भाजपा कार्यकर्ते विचलित झाले आहेत. तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारावर निष्ठा ठेवून कार्य करणारे मुंडे भक्त माजी आ. भीमराव धोंडे यांना सहकार्य करत आले आहेत. मात्र यावेळी धोंडे यांनी वेगळी वाट धरल्याने निष्ठवान मुंडे भक्तांचे मौन दिसून येत आहे.