

माजलगाव (लातूर ) : माजलगावच्या मराठा समाजाच्या लढवय्या कार्यकर्ते राजेंद्र होके पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणाबरोबरच नौकरीचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. राजेंद्र होके यांची स्वप्नं आम्ही अपुरी राहू देणार नाही. त्यांच्या लेकरांना कसलंही दुःख होऊ देणार नाही. त्यांचे शिक्षण, नोकरी आणि आयुष्य घडवण्याची जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले.
सोमवारी (ता. १०) माजलगाव येथील मराठा भवनात आयोजित शोकसभेत बोलताना जरांगे म्हणाले की, राजेंद्र होके हे मराठा समाजाचे प्रामाणिक आणि निष्ठावान योद्धे होते. त्यांनी समाजासाठी प्राण दिले; त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपली आहे. त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभं राहायला हवं. या प्रसंगी आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, मागील काळात त्यांच्या घरावर झालेल्या जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असली तरी स्वतःकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. ते पुढे म्हणाले ज्यांच्यावर या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, त्यांच्याविरोधात माझी काहीही तक्रार नाही. त्या युवकांची मुक्तता व्हावी यासाठी मी वेळप्रसंगी न्यायालयात शपथपत्र देण्यासही तयार आहे. या वक्तव्याने सभागृहात उपस्थित मराठा बांधवांनी टाळ्यांचा गजर केला. सभेला आमदार प्रकाश सोळंके, माजी सभापती नितीन नाईकनवरे, शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, प्रदिप सोळंके, विजय दराडे, भाई गंगाभिषण थावरे, अॅड. बी. आर. डक, नारायण होके, पुरूषोत्तम जाधव, शिवाज्ञा हॉस्टेलचे जीवन नखाते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण झोडगे यांनी केले. मराठा भवनात भरलेल्या या श्रद्धांजली सभेत समाजकार्य, एकता आणि सहकार्याचा संदेश देत राजेंद्र होके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.