Latur News : श्रावणातील तिसऱ्या शनिवारी परचंडा दुमदुमले file photo
लातूर

Latur News : श्रावणातील तिसऱ्या शनिवारी परचंडा दुमदुमले

अहमदपूर : रोकडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी; पायी वारीची परंपरा कायम

पुढारी वृत्तसेवा

Latur News: Parchanda reverberates with festive fervor on the third Saturday of Shravan

अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील जागृत श्री रोकडोबा हनुमान देवस्थान भाविकांच्या अलोट गर्दीने अक्षरशः फुलून गेले. 'रोकडोबा महाराजांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात', अशी भाविकांची दृढ श्रद्धा असल्याने अहमदपूरसह लातूर, उदगीर, जळकोट, परभणी, बीड आदी परिसरातून हजारो भाविकांनी परचंड्याकडे धाव घेतली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. 'रोकडोबा महाराज की जय' च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

अनेक भाविकांनी पायी चालत देवस्थान गाठून दर्शन घेतले. काही भाविक वर्षानुवर्षे पायी वारीची परंपरा जपत असून, श्रावणातील ही वारी त्यांच्या श्रद्धा आणि भक्तीचा अविभाज्य भाग बनली आहे. यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावत रोकडोबा महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. परचंडा येथील श्री रोकडोबा हनुमान देवस्थान पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संकटाच्या प्रसंगी रोकडोबा महाराजांचा धावा केल्यास मनाला आधार मिळतो आणि मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे.

त्यामुळे वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. विशेषतः श्रावण महिन्यातील शनिवार आणि सोमवार या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. श्री रोकडोबा देवस्थानच्या वतीने दर शनिवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र चालविण्यात येते. गावातील नागरिकही स्वयंस्फूर्तीन दिवसभर सेवा देत या उपक्रमात सहभागी होतात.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या अन्नदानाच्या परंपरेमुळे भाविकांना दर्शनासोबतच मोफत प्रसादाचा लाभमिळतो. श्री रोकडोबा हनुमान मंदिराला कळस नसणे हे या देवस्थानचे वैशिष्ट्य मानले जाते. मंदिरावर कळस बांधण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले; मात्र ते पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत. त्यामुळे कळस नसलेले हे मंदिर भाविकांच्या कुतूहलासोबतच श्रद्धेचेही केंद्र बनले आहे. श्रावणातील भाविकांच्या गर्दीमुळे परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही चांगला व्यवसाय मिळाला.

पूजेसाठी लागणारे साहित्य, नारळ, फुले, प्रसाद आणि विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले. श्रद्धा, पायी वारी, अन्नदान आणि भक्तिमय वातावरणामुळे परचंड्याचा श्रावणी शनिवार यंदाही विशेष ठरला. रोकडोबा महाराजांचे दर्शन घेऊन भाविकांनी भक्तिभावाने परतीचा मार्ग धरला. यावेळी मन्मथ कापसे, वसंत जाधव, नाना पाटील, बाळू पाटील, संभाजी जाधव, जगन्नाथ जाधव, भास्कर जाधव, विशाल जाधव, अजय मुंढे, श्रीपाद नाईकवाडे, कमलाकर जाधव, दयानंद तराटे, पवन जाधव, भाऊराव जाधव, जगदीश जाधव, दिगंबर कदम, कृष्णा नाईकवाडे, विजय मुंढे, पवन कोलपुसे, गोपाळ कानवटे आदी उपस्थित होते.

देवस्थानची वैशिष्ट्ये

श्रावणातील शनिवार- सोमवारी भाविकांची मोठी गर्दी; अहमदपूरसह लातूर, उदगीर, जळकोट, परभणी, बीड भागातून भाविकांची उपस्थिती; अनेक भाविकांची पायी वारीची वर्षानुवर्षांची परंपरा; दर शनिवारी भाविकांसाठी मोफत अन्नछत्र; कळस नसलेले मंदिर हे विशेष आकर्षण; पूजासाहित्य व प्रसाद विक्रीतून स्थानिक व्यावसायिकांना रोजगार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT