

निलंगा : तालुक्यातील केळगाव येथे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मोठा भाऊ हे जग सोडून गेल्याचे पाहून धक्का सहन न झाल्याने लहान भावानेही त्याच वेळी प्राण सोडले.
केळगाव येथील भाऊराव निवृत्ती राठोडकर (वय ९० वर्षे) हे मागील महिनाभरापासून आजारी होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शेवटचे म्हणून पाणी व दूध पाजण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू माणिक निवृत्ती राठोडकर (वय ८५ वर्षे) आले असता दूध जात नव्हते आणि त्याचवेळी भाऊराव यांचे दुःखद निधन झाले. डोळ्यांसमोर "आपला भाऊ आपल्याला सोडून गेला" हे दुःख सहन न झाल्याने माणिक यांना मोठा मानसिक धक्का बसला आणि अवघ्या अर्ध्या तासात त्यांचेही दुःखद निधन झाले.
एकाच दिवशी, एकाच वेळी दोन सख्ख्या भावांचा विरहाने मृत्यू झाल्याने केळगाववर शोककळा पसरली आहे. या दोन्ही भावांच्या अतूट प्रेमामुळे गावकरी त्यांना प्रेमाने राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून संबोधत होते. आजच्या २१ व्या शतकात, ५-जीच्या जमान्यात पती-पत्नी, भाऊ-भाऊ, बाप-लेक यांच्यात दुरावा वाढत आहे. शेतीसाठी, घरासाठी, मालमत्तेसाठी, शेतीच्या बांधासाठी काट्या घालून डोकी फोडताना आपण पाहत आहोत. सर्व प्रेम मोबाईलमध्ये अडकले असताना, या भावांच्या अथांग प्रेमाची ही घटना समोर आल्याने गावात राम-लक्ष्मणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
"जुनं ते सोनंच" हे खरं आहे. 40-50 वर्षांपूर्वीचं आपल्या पूर्वजांच प्रेम अत्यंत जिव्हाळ्याचं, आपुलकीचं होतं. पिढी बदलली, काळ बदलला आणि प्रेमाची व्याख्याच कदाचित पुढच्या पिढीला कळणार नाही. परंतु हे दोन्ही भाऊ आयुष्यभर अत्यंत प्रेमाने एकत्र राहिले. कधीही दोघांमध्ये वाद-तंटा झाला नाही, असे गावकरी सांगत आहेत. मोठ्या भावाच्या विरहाने लहान भावाने प्राण सोडण्याची ही क्वचितच घडणारी घटना घडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही भावांवर शनिवारी दुपारी १ वाजता एकाच घरातून एकत्र अंत्ययात्रा काढून केळगाव सार्वजनिक स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात एकाच ठिकाणी, एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या या अतूट प्रेमाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, मुले, सुना, नातवंडे असा मोठा राठोडकर परिवार आहे.