शिरूर अनंतपाळ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील सुनील विनायक बिरादार (वय ४७) यांनी टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले.
या घटनेनंतर संतप्त कुटुंबीय व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत लातूर-उदगीर महामार्गावरील येरोळ मोड येथे मृतदेह आणून चक्काजाम आंदोलन सुरू केले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
सुनील बिरादार यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये, "मी सुनील विनायक बिरादार, रा. सुमठाणा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवत आहे. एक मराठा, लाख मराठा. जय शिवराय!" असा मजकूर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रशासनासमोर विविध मागण्या ठेवल्या आहेत. कुटुंबातील एका सदस्याला तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने द्यावे, तसेच मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे.
मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली आहे. येरोळ मोड येथे मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले असून रात्री दहा वाजताही महामार्गावर चक्काजाम सुरूच होता. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.