Latur News: Jalkot bus station built at a cost of five crores is awaiting inauguration!
जळकोट, पुढारी वृत्तसेवा : पाच कोटी रुपये खर्चत उभारलेली देखणी इमारत, प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याचे आश्वासन; मात्र बांधकाम पूर्ण होऊनही नव्या बसस्थानकाचे लोकार्पण अद्याप रखडले आहे. जळकोट येथील जुने बसस्थानक पूर्वीप्रमाणेच सुरू असून, कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेली नवीन वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या पैशातून उभारलेल्या या सुविधेचा लाभ प्रवाशांना मिळणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जळकोट येथे सुमारे पाच कोटी रुपये खर्चुन नवीन बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊनही प्रत्यक्ष बसस्थानक सुरू झालेले नाही. त्यामुळे नवीन इमारतीचा वापर कधी सुरू होणार, याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकतेसोबतच नाराजीही वाढत आहे.
सार्वजनिक निधीतून एखादी इमारत उभारणे म्हणजे केवळ बांधकाम पूर्ण करणे नव्हे, तर तिचा प्रत्यक्ष वापर सुरू करून नागरिकांना सुविधांचा लाभ मिळवून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र जळकोटमध्ये नवीन बसस्थानक तयार असूनही जुने बसस्थानक सुरूच आहे. नवीन इमारतीचे लोकार्पण रखडण्यामागे नेमकी प्रशासकीय किंवा तांत्रिक अडचण काय, याबाबत स्पष्टता नाही.
विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी बसस्थानक ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची सुविधा आहे. नवीन बसस्थानक सुरू झाल्यास प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र उद्घाटनाची तारीख निश्चित नसल्याने या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकप्रतिनिधींची तारीख मिळताच उद्घाटन !
यासंदर्भात एसटी महामंडळाच्या स्थापत्य विभागाचे उपअभियंता जगदीश कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, जळकोट बसस्थानकाच्या नवीन वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींची तारीख घेऊन जळकोट, अहमदपूर आणि शिरूर ताजबंद येथील बसस्थानकांचे एकाच दिवशी उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसून, विभागाचे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून तारीख ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाच कोटींच्या नव्या बसस्थानकाचे लोकार्पण नेमके कधी होणार, याकडे जळकोट तालुक्यातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.