Latur News: Drought scorches crops; no rain for 45 days
औसा, पुढारी वृत्तसेवा एकीकडे आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी, दुसरीकडे पावसाअभावी करपून गेलेली शेतातील पिके... गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने औसा तालुक्यावर कोरखधा दुष्काळाचे गंभीर सावट आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची चिंता, आर्थिक संकट आणि भविष्यातील पाणी-चारा प्रश्नांची धास्ती अशा चहूबाजूंनी संकटांनी घेरले असतानाही बळीराजाने आपल्या दुःखापेक्षा वर्षभर शेतात राबणाऱ्या मुक्या सखा-सोबत्याला अधिक महत्त्व दिले. दुष्काळाने शेतकऱ्याच्या शेतातील धन करपाले, पण त्याच्या मनातील कृतज्ञतेचा ओलावा मात्र आटला नाही. याच भावनेतून औसा तालुक्यात बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
बैलपोळा हा शेतकन्याच्या भावविश्वातील अत्यंत जिव्हाळ्याचा सण. वर्षभर ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतीची कामे करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. यंदा मात्र या सणावर कुष्काळाची छाया होती. शेतात हिरवाईऐवजी करपलेली पिके दिसत असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या बैलराजाला सणाच्या आनंदापासून वंचित ठेवले नाही. सकाळपासूनच शेतकऱ्यांची बैलजोडी सजविण्याची लगबग सुरू होती.
नदी-नाले कोरडे पडल्याने बैलांना विहीर, बोअरवेल आणि नळाच्या पाण्यावर आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर अंगावर रंगीबेरंगी झुली, शिंगांना बेगड, गळ्यात फुलांच्या माळा, गौडे आणि डोक्यावर रंगीबेरंगी फुग्यांचे तुरा बांधून बैलजोडीला नवरीसारखे सजविण्यात आले. दुपारनंतर ग्रामीण भागातील मारुती मंदिराच्या पारावरून बैलजोडी, गाई म्हशींची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि पारंपरिक उत्साहाने वातावरण भारून गेले. घरी आणल्यानंतर बैल व गाईला पुरणपोळीचा नैवेद्य भरवून ओवाळण्यात आले.
विधिवत पूजा करून गाय आणि बैलाचे प्रतीकात्मक लग्रही लावण्यात आले. ग्रामीण भागात शेतीचे क्षेत्र कमी होत असून बैलबारदाना सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी होत असल्याचे चित्र अनेक गावांत दिसत आहे. या बदलत्या शेतीव्यवस्थेचे प्रतिबिंब यंदाच्या पोळ्यातही दिसले. आलमला येथे बैलजोडीबरोबरच शेतकऱ्याच्या आधुनिक शेतीचा साथीदार असलेल्या ट्रॅक्टरचीही मिरवणूक काढण्यात आली. परंपरा आणि आधुनिकतेचा हा संगम यंदाच्या पोळ्याचे वैशिष्ट्य ठरला.
औसा शहरासह तालुक्यातील विविध गावांत बैलजोडीच्या मिरवणुका काढून उत्साहात पूजा करण्यात आली. लहानांपासून थोरांपर्यंत ग्रामस्थांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळाने बळीराजाची परीक्षा घेतली आहे; मात्र या परीक्षेतही आपल्या मुक्या सखा-सोबत्याविषयीची कृतज्ञता जपून शेतकन्याने आपल्या मोठ्या मनाचा परिचय दिला, शेतातील पीक करपले, आशा मावळल्या; पण बैलराजावरील प्रेम आणि कृतज्ञतेची परंपरा मात्र आजही तितकीच हिरवी आहे.
पिके करपली; पण शेतकऱ्याचे मन मोठेच राहिले!
यंदाचा बैलपोळा हा केवळ सण नव्हता, तर संकटातही आपल्या मुक्या सोबत्याला विसरून न जाणाऱ्या शेतक-याच्या मोठ्या मनाचे दर्शन घडविणारा दिवस ठरला. हातात पैसा नाही, शेतात उत्पन्नाची आशा नाही, पुढचा हंगाम कसा साधायचा याची चिंता आहे; तरीही वर्षभर आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाच्या वाट्याला आनंद यावा, यासाठी शेतकऱ्याने आपल्या परीने कोणतीही कसर सोडली नाही. "बैल हा आमच्यासाठी केवळ पशुधन नाही, तर कुटुंबातील सदस्य आणि खरा सखा आहे. कितीही मोठे संकट आले तरी वर्षभर आमच्यासाठी राबणाऱ्या बैलराजाची पूजा करणे हे आमचे कर्तव्य आहे. यंदा परिस्थिती कठीण असली तरी त्याच्याप्रती असलेली कृतज्ञता आम्ही कशी विसरणार?" अशी भावना आलमला येथील शेतकरी सिद्धेश्वर चरकपल्ले या शेतकऱ्याने व्यक्त केली.