लातूर : सर्वधर्मसमभाव, विश्वबंधुत्व आणि मानवतेचा सार्वत्रिक संदेश देणारे विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन लातूर तालुक्यातील रामेश्वर (रुई) येथे उभारण्यात आले असून या भव्य वास्तूचा लोकार्पण सो-हळा १४ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात होणार असून या सोहळ्यास देशातील तसेच जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कराड म्हणाले, भारतीय संस्कृतीचे 'वसुधैव कुटुंबकम्, हा विचारच जगाला विनाशापासून वाचवू शकतो. 'विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन' ही वास्तू या विचारांचा प्रसार जगभर करेल. २५० फूट लांब व ९० फूट रुंद अशी ही भव्य वास्तू भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. या भवनात मानवतेचा इतिहास घडविणाऱ्या संत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि महापुरुषांचे विचार व प्रतिमा समाजाला प्रेरणा देतील. ही वास्तू केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्य करणार आहे. येथे योग व ध्यानधारणा केंद्र, सरपंच परिषद, कृषी मेळावे, कुस्ती स्पर्धा, इनडोअर खेळ, रक्तदान शिबिरे, महिला बचत गटांच्या बैठका, संस्कार शिबिरे, लोकशिक्षण कार्यक्रम, सांस्कृतिक मेळावे वारकरी प्रशिक्षण,
पत्रकारांसाठीचे मेळावे, लोकोपयोगी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, भागवत सप्ताह, भजन कीर्तन, भारूड संबंधी कार्यक्रम, विविध वस्तूंचे प्रदर्शन यांसारखे विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. रामेश्वर (रुई) येथील हे मानवता तीर्थ भारतीय मूल्ये, संस्कृती आणि धर्मनिरपेक्षतेचे एकत्रित प्रतिक ठरेल. हे गाव आणि हे भवन जगाला एकतेचा, शांततेचा व मानवतेचा नवा संदेश देईल, असा विश्वास यावेळी डॉ. कराड यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस प्रगतिशील शेतकरी काशीराम कराड, डॉ.महेश थोरवे आणि गिरीश दाते उपस्थित होते.
महात्मा गांधींनी स्वयंपूर्ण व आदर्श खेड्याची मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे काम डॉ. कराड यांच्या पुढाकाराने झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने रामेश्वर (रुई) गावाचे रूपांतर स्वावलंबी, सर्वधर्मीय एकतेचे केंद्र म्हणून झाले आहे. प्रभु श्रीराम मंदिर, जामा मस्जिद, हजरत जैनुद्दिन चिश्ती दर्गा, तथागत भगवान गौतम बुद्ध विहार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन आणि संत गोपाळबुवा महाराज समाधी मंदिर यांचे एकत्र अस्तित्व हे या गावातील सर्वधर्मसमभावाचे मूर्त उदाहरण ठरले आहे.