लातूर : लातूर महापालिकेत मंगळवारी (दि.७) झालेली स्थायी समितीची बैठक आरोप प्रत्यारोपांनी गाजली. या बैठकीत बांधकाम व आरोग्य विभागात होत असलेल्या प्रशासकीय अनागोंदीबद्दल विरोधक व सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत याच्या चौकशीची मागणी केली.
स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले व आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीस सुरुवात झाली. पावसाळ्यात शहरातील अनेक प्रभागांत झालेल्या रस्त्याची दुरवस्था ही महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा असल्याचा आरोप सदस्यांनी केला. आरोग्य विभागाबाबत तत्कालीन आयुक्त मानसी मीना यांनी काढलेला आदेश संबंधितांनी दाबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक आतिष चिकटे यांनी केला व याच्या चौकशीची मागणी केली.
फाईल गहाळ होत असेल सापडत नसेल तर संबंधितावर जबाबदारी निश्चित करुन त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना फाईली सांभाळता येत नसतील तर त्यांच्याकडून योग्य कारभाराची अपेक्षा कशी करायची? असा सवाल अनेक नगरसेवकांनी यावेळी केला. बांधकाम विभागाच्या कार्यपध्दती व भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत या विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
नगरसेवकांनी मागितलेली माहिती अधिकारी देत नाहीत. त्यांच्या पत्राचे उत्तर महिनोमहिने दिले जात नाही, असे आरोप नगसेवकांनी केले. भाजपच्या नगरसेविका आदिती पाटील कव्हेकर यांनी शहर स्वच्छता तसेच रसत्याच्या दुरवस्थेवरून प्रशासनाला धारेवर धरले. त्यांच्या वॉर्डातील रसत्यावरून नागरिकांना धड चालता येत अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत रस्ता दुरुस्तीची मागणी त्यांनी केली. स्वाती घारपडे यांनाही या प्रश्नावर आवाज उठवला.
काँग्रेसचे नगरसेवक दीपक सूळ यांनीही आक्रमकपणे रसत्याचा विषय मांडला. गिरीश ब्याळे, अहमदखाँ पठाण यांनीही विषय मांडले. दरम्यान भाजपाचे रविशंकर जाधव यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांनी काँग्रेसने अनेक महत्त्वाच्या विषयाला बगल दिल्याचा आरोप केला. दरम्यान आयुक्त कुलकर्णी यांनी सर्व नगरसवेकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपण नुकताच पदभार स्वीकारला असून मांडण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची माहिती घेऊन ते मार्गी लावू असे सांगितले.