लातूरमध्ये तिरंगी लढतीमुळे त्रिशंकूची शक्यता pudhari photo
लातूर

Latur Municipal Election : लातूरमध्ये तिरंगी लढतीमुळे त्रिशंकूची शक्यता

मॅजिक फिगर बदलणार राजकीय समीकरणे; सर्वांचे लक्ष निकालाकडे

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत भाजपापुढे सत्ता राखण्याचे तर काँग्रेसपुढे सत्ता पुन्हा मिळविण्याचे आव्हान असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने रणांगणात ताकद दाखविल्याने ही निवडणूक त्रिशंकू झाली. कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा गुलाल उधळता येणार नसल्याने मॅजिक फिगरसाठी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

लातूर महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेईपर्यंत महायुती व महाआघाडीत बिघाडी झाली आणि साऱ्याच पक्षांनी स्वबळावर आपापले खेळाडू मैदानात उतरविले. 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसने 49 जागांवर जिंकून भाजपाला खाते खोलून दिले नव्हते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागांवर जिंकली होती. तर 2017 च्या निवडणुकीत झिरो असलेल्या भाजपाने 36 जागा जिंकून बहुमत मिळवत काँग्रेसच्या बालेकिल्लाला ऐतिहासिक धक्का दिला होता.

त्यावेळी काँग्रेस 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली होती. मात्र पुढच्या अडीच वर्षातच म्हणजे 2019 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी राजकीय डावपेच टाकत भाजपचे नगरसेवक फोडून महापौर बनत काँग्रेसची सत्ता पुन्हा प्रस्थापित केली होती. आता 2026 च्या निवडणुकीत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसचा हात सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची घड्याळ हाती बांधून भाजपासह काँग्रेसला आव्हान दिले आहे.

या निवडणुकीत भाजपाने 70, काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 5 जागांवर सोबत घेऊन युती केली. राष्ट्रवादी काँग्रेसने 65 उमेदवार उभे करून काही प्रभागांमध्ये स्थानिक आघाडी केली आहे. शिंदे शिवसेनेचे 11, ठाकरे सेनेचे 6, शरद पवार राष्ट्रवादीचे 19, एमआयएम 9, आप 8, बसपा 4, रासप 2, स्वराज्य शक्ती सेना 3, महा-राष्ट्र विकास आघाडी पक्ष 3, समाजवादी पार्टी 1 व अपक्ष 88 असे एकूण 359 उमेदवार रिंगणात आहेत.

ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होईल अशी शक्यता होती. मात्र विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी लिहून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व एकेक सवंगडी गोळा करत 65 जागांवर उमेदवार उभे केले. त्यामुळे लातूरची ही निवडणूक भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी झाली. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभा झाल्या. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विलासरावांची आठवण लातूरमधून पुसली जाईल, असे वक्तव्य करून लातूरकरांच्या अस्मितेला ठेच पोहोचवत विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले.

काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख यांनी प्रभाग टू प्रभाग सभा घेऊन लातूर पिंजून काढले आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या विलासरावांवरील वक्तव्याचे भावनिक वातावरण तयार करण्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसने संधी साधली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांनी शब्दाचा पक्का असल्याचे सांगत लातूरच्या विकासाचा वादा केला.

एकंदर अडीच अडीच वर्षे सत्ता उपभोगलेल्या भाजपा व काँग्रेसने या निवडणुकीत वर्षानुवर्षे लातूरकर सामोरे जात असलेल्या कचरा, पाणी, वीज, रस्ते या मूलभूत समस्यांवरच आश्वासनांचा पाऊस पाडत एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याने लातूरकरांसाठी दोन्ही पक्षांच्या सभा करमणुकीचे साधन ठरल्या. तर या दोन्ही पक्षांना कडवे आव्हान दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे व माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मित्रपक्ष भाजपासह काँग्रेस लातूरकरांची विकासाच्या नावाखाली कशी दिशाभूल करीत आहे, असे मुद्दे प्रचारात घेऊन मतदारांना सामोरे गेले.

  • राजकीय विश्लेषकांच्या मते, बहुमताचा गुलाल कोण्या एका राजकीय पक्षाला लागण्याची शक्यता नाही. भाजप 22 ते 28, काँग्रेस 24 ते 30, राष्ट्रवादी काँग्रेस 4 ते 8, इतर पक्षांच्या 3 ते 4 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक त्रिशंकू होण्याची शक्यता असून तसे झाले तर महापालिकेच्या सत्तेसाठी बहुमताच्या जवळ जाणारे भाजपा आणि काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांचा टेकू घ्यावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT