लातूर : महानगरपालिकेच्या तोंडावर सुरू झालेली काँग्रेसमधील गळती महापालिका निवडणुकीचा महासंग्राम पाच दिवसांवर येऊन ठेपला असतानाही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. काँग्रेसमधील नाराज व अस्वस्थ झालेल्या आजी-माजी महापौर, उपमहापौरांसह अनेक नगरसेवकांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. आज लातूरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक रविशंकर जाधव, माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान, पुनीत पाटील यांच्यासह अन्य पक्षांतील नऊ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महानगरपालिकेच्या रणांगणातील योद्ध्यांचे चेहरे २ जानेवारी रोजी दिसणार असले तरी महापालिकेचा महासंग्राम पक्षप्रवेशामधूनच होताना दिसत आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रम लागण्यापूर्वीच लातूरचे माजी महापौर व काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेले विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला व शहरातील राजकीय समीकरणांची दिशाच बदलून टाकली. त्यानंतर त्यांचे सहकारी राहिलेले माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व इतर कार्यकर्त्यांना विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये आणले. त्यानंतर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता काँग्रेसमध्ये अनेक वर्षे योगदान दिलेले व चार वेळा नगरसेवक राहिलेले महापालिकेचे सभागृह नेते रविशंकर जाधव व त्यांचे बंधू काँग्रेसचे माजी शहर सरचिटणीस तथा स्वस्त धान्य दुकान असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज जाधव हे पक्षात नाराज होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज लातूर येथे दोन्ही बंधूंनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
माजी नगरसेवक व व्यावसायिक पुनीत पाटील, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान यांचे पुत्र धर्मेंद्रसिंह चौहान, गनिमी कावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड, व्यापारी आघाडीचे हातिम शेख, चंद्रकांत साळुंखे, बबलू चव्हाण, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक देडे, ऋषी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी लातूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशआप्पा कराड, नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, माझी उपमहापौर देविदास काळे, माजी सभापती शैलेश गोजमगुंडे, प्रेरणाताई होनराव, सुधीर धुत्तेकर, सरचिटणीस संजय गिर, रागिणीताई यादव, प्रविण कस्तुरे, निखिल गायकवाड, निवडणूक कार्यालय प्रमुख तुकाराम गोरे आदी उपस्थित होते.
विकासावर विश्वास ठेवत अनेक जण भाजपात : आ. निलंगेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व कल्याणकारी कार्यावर विश्वास ठेवत अनेकांचा भाजपात प्रवेश घेतला. विकासाला पाठबळ देण्यासाठी भविष्यातही अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे मत लातूर शहर निवडणूक प्रमुख माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केले. मागील ११ वर्षात देशात व राज्यात होत असलेली विकासकामे जनतेने पाहिली आहेत. भाजपाच्या विचारावरील सरकार देशात असून या पक्षात देशहिताला प्राधान्य दिले जाते. या काळात देशाची विकासाच्या मार्गावर घोडदौड सुरू आहे. त्यामुळे इतर पक्षात नेते व कार्यकर्त्यांनाही आता भवितव्य राहिलेले नाही. यामुळेच भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे आ. निलंगेकर म्हणाले.