Latur Municipal Election Results 2026 Congress Victory
लातूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने आपला गड राखत दणदणीत विजय संपादन केला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली काँग्रेसने ७० पैकी तब्बल ४७ जागांवर विजय मिळवून महापालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.
भाजप-राष्ट्रवादीचा धुव्वा; देशमुखांची जादू कायम
निवडणुकीपूर्वी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आमदार अमित देशमुख यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या या रणनीतीसमोर भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रभाव फिका पडला. भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली होती, तरीही त्यांना २२ पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत.
'बालेकिल्ला' काँग्रेसकडेच सुरक्षित
लातूर महापालिकेच्या इतिहासात १९५२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१९ हा अडीच वर्षांचा अपवाद वगळता लातूरकरांनी नेहमीच काँग्रेसच्या हाताला साथ दिली आहे. या निकालाने लातूर हा आजही काँग्रेसचाच अभेद्य बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
निकाल थोडक्यात
लातूर महानगरपालिकेत ४७ जागांसह काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. स्पष्ट बहुमतामुळे आता महापालिकेत काँग्रेसचाच महापौर विराजमान होईल. तर भाजपला २२ जागांसह प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. विक्रांत गोजमगुंडे यांच्या पक्षांतराचा राष्ट्रवादीला कोणताही विशेष फायदा झाला नाही. गोजमगुंडे यांच्या रूपाने पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळाला. या विजयानंतर संपूर्ण लातूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.