Latur Crime : जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलाने जीवन संपवले, मृतदेह पोत्यात बांधून शेतात पुरला  File Photo
लातूर

Latur Crime : जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलाने जीवन संपवले, मृतदेह पोत्यात बांधून शेतात पुरला

ही घटना रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती.

पुढारी वृत्तसेवा

Latur Mother murdered for opposing land sale

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा: जमीन विकून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईची ६ जुलै रोजी हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर मुलानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.७) रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या अनुषंगाने रेणापूर पोलिस तपास करीत आहेत.

तालुक्यातील सांगवी येथील काकासाहेब वेणूनाथ जाधव (४८) याने रेणापूर पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान मृत व्यक्तीच्या आईचाही मृतदेह गावातील स्वतःच्या शेतात रात्री ९ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने या प्रकरणी गावात व त्यांच्या नातेवाइकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी या दोन्ही घटना घडल्या त्या ठिकाणी पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, रेणापूरचे पोलिस निरीक्षक आदींनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गुरुवारी केलेल्या आत्महत्येप्रकरणी मृताच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

या प्रकरणी मृत काकासाहेब जाधव यांचा मुलगा शुभम काकासाहेब जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या वडिलांना माझ्या बहिणीच्या लग्नाचे कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठी माझी आजी मृत समिंदरबाई यांच्याकडे माझे वडील काकासाहेब जाधव हे आपले शेत विकून कर्ज फेडू, असे म्हणत होते. परंतु आजी शेत विक्री करण्यास सतत विरोध करीत होती.

त्यामुळे लग्नात झालेले कर्ज कसे फेडायचे ? असा प्रश्न माझे वडील मृत काकासाहेब जाधव यांच्यासमोर उभा राहत असल्याने त्यांनी माझ्या आजीला जिवे मारून त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या दोन्ही घटनांनंतर रेणापूर पोलिसांनी रेणापूरच्या शासकीय रुग्णालयात दोन्ही मृतांचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (दि.८) दुपारी सांगवी येथे आई व मुलगा यांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताचा मुलाने शुभम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा रनं २९४ / २५ कलम १०३ (१) २३८ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

खुनामागे अनेकांचा हात : नातेवाइकांचा आरोप

मृत समिंदरबाई जाधव हिला चार मुली व एक मुलगा, सून नातू आहेत. त्यांच्या चारही मुलींची लग्न झाली आहेत. यातील चारही मुलींशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की, आमच्या आईच्या व भावाच्या नावे असलेली जमीन आम्हाला नको म्हणून हक्कसोड पत्र करून दिले आहे. आमची आईसोबत भाऊ काकासाहेब व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सतत भांडणे होत असत. भाऊ आईला नेहमी मारहाण करीत असे. आईला घर सोडून बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. हे काम एकट्या व्यक्तीचे काम नाही. कोणी तरी संगमताने खून केला असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT