MLA Abhimanyue Pawar Defamation Case
औसा : आमदार अभिमन्यू पवार यांच्याबाबत सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या तसेच मुलाखतीच्या माध्यमातून कथित बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे महेबुब इब्राहिम शेख (रा. शिरूर कासार, जि. बीड) आणि अॅड. अशोक बेंद्रे यांच्याविरुद्ध औसा व किल्लारी पोलिस ठाण्यात स्वतंत्र NCR नोंदविण्यात आली आहे.
अक्रमखान गुलामखादरखान पठाण यांनी औसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, महेबुब इब्राहिम शेख यांनी सोशल मीडिया आणि काही वृत्तवाहिन्यांवर आमदार अभिमन्यू पवार यांच्याबाबत कथित आरोप केले. या आरोपांमुळे आमदार पवार यांची सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, बालाजी गणपती मस्के यांनी किल्लारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एमपीएससी ड्रग्स इन्स्पेक्टर परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणासंदर्भात अॅड. अशोक बेंद्रे यांनी एका मुलाखतीत आमदार पवार यांच्याबाबत आरोप केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हे आरोप निराधार असल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, त्यातून आमदार पवार यांची बदनामी झाल्याचे म्हटले आहे.
दोन्ही तक्रारींच्या आधारे भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ३५६ अंतर्गत पोलिसांनी NCR नोंदविली आहे. या प्रकरणांची पुढील चौकशी व कायदेशीर कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.