Marathwada Farmers Relief
निलंगा : लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील कलांडी, वलांडी व देवणी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासाठी विशेष दुष्काळी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
लातूर जिल्ह्यात यंदा सुमारे ९६ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह विविध पिकांचा त्यात समावेश आहे. पाऊस वेळेवर होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. जलाशयांमधील पाणीसाठा कमी होत असून भूजल पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचविणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने शासनाने विविध ठिकाणी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणीही निलंगेकर यांनी केली.
पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या मदत व पुनर्वसन धोरणानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच महसूल व कृषी विभागाला पंचनाम्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी संजय दोरवे, दगडू सोळंके, शिवराज बिरादार, कुमोद लोभे, रोहित पाटील गौरकर, मनोज पाटील, शकील पटेल, रमेश पाटील आदी उपस्थित होते.