Latur Loan Recovery Staff Safety pudhari photo
लातूर

Latur Loan Recovery Staff Safety: कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

शिवीगाळ, मारहाण आणि धमक्यांच्या घटनांनी कर्मचारी भयभीत; पोलिस अधीक्षकांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यातील बँका, आरबीआय नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) आणि मायक्रोफायनान्स संस्थांमध्ये कार्यरत कर्जवसुली कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कर्जवसुलीसाठी ग्रामीण भागात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, धमकावणे तसेच अडवणूक करण्याच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन संरक्षण आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

कर्जवसुलीचे काम करताना कर्मचाऱ्यांना अनेकदा विरोधाचा सामना करावा लागतो. कर्तव्य बजावत असताना मारहाण करणे, धमकावणे किंवा कामात अडथळे निर्माण करणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांविरोधात चिथावणीखोर संदेश प्रसारित करून त्यांच्याविषयी गैरसमज आणि तणाव निर्माण करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

बँका आणि वित्तीय संस्थांमधील कर्मचारी हे संस्थेच्या नियमावलीनुसार तसेच वरिष्ठांच्या निर्देशानुसार काम करतात. कर्जाचे व्याजदर निश्चित करणे, कर्ज मंजूर करणे किंवा संस्थेची धोरणे ठरविणे हे त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे संस्थांच्या धोरणांबाबत असलेला रोष कर्जवसुली कर्मचाऱ्यांवर काढणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कर्जवसुलीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्भयपणे कर्तव्य बजावता यावे, त्यांच्या जीविताचे आणि सुरक्षिततेचे रक्षण व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच धमकी, मारहाण आणि अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध बँका, एनबीएफसी आणि मायक्रोफायनान्स संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT