लातूर : वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट व सीटबेल्ट वापर अनिवार्य करण्याची मोहीम आता पोलिस यंत्रणेमधूनच सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रस्ते अपघातांमध्ये वाढलेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलिस दलाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात पोलिस विभागातील सर्व अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी यांच्यासाठी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. नियमांची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरणे आणि चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट न लावणे ही अपघाती मृत्यूंची प्रमुख कारणे असल्याचे पोलिस प्रशासनाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार शासकीय तसेच खासगी वाहनांचा वापर करताना हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.याचबरोबर, पुढील टप्प्यात नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर तपासणी मोहीमही हाती घेतली जाणार आहे. हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून नियमांचे पालन सुनिश्चित केले जाईल. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी नागरिकांना प्रत्येकाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आवाहन केले आहे. सुरक्षितता हीच जबाबदारी आहे या भावनेतून प्रत्येक नागरिकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.