

कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ या मार्गावर शनिवारी दुपारी भरधाव चारचाकीचा थरार घडला. पाच दुचाकींना कारने फुटबॉलसारखे उडवले. या भीषण अपघातात वकील मुलीसह तिच्या वडिलांचा करुण अंत झाला; तर दोघेजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. संतप्त जमावाने बेदरकार चारचाकी चालवणार्या वीसवर्षीय तरुणाची धुलाई करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दीपक सहदेव वंशे (62, सणगर गल्ली, रविवार पेठ, कोल्हापूर) व अॅड. भाग्यश्री लक्ष्मण गवळी (30, रा. कसबा बावडा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकीची नावे आहेत. कैवल्य उदय नाईक (24, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), धनंजय करजगार (44, रा. आझाद गल्ली) या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातप्रकरणी मयुरेश योगेश पाटील (20, रा. 8 वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मार्केट यार्ड येथे पशुखाद्य विक्रेते असलेल्या योगेश पाटील यांचा मुलगा मयुरेश दुपारी साडेतीनच्या सुमारास राजारामपुरीतील घरातून आलिशान मोटार घेऊन बाहेर पडला. राजारामपुरी येथील जनता बझारच्या दिशेने भरधाव जात असताना त्याने कोपर्यावरच एका वाहनाला धडक दिली. या धडकेनंतर संबंधित वाहनचालकासह परिसरातील नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
या अपघातानंतर भेदरलेल्या मयुरेशने चारचाकी न थांबवता ती भरधाव घेऊन शाहू मिल चौकाच्या दिशेने पुढे नेली. यावेळी काही वाहनधारक पाठलाग करीत असावे या भीतीने त्याने शाहू मिल चौकातून भरधाव वेगातच वळसा घालत तो कोटीतीर्थच्या दिशेने गेला. भरधाव वेगामुळे त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि कोटीतीर्थकडून शाहू मिल चौकाकडे येणार्या एका पाठोपाठ एक अशा पाच दुचाकींना समोरून उडवतच तो पुढे गेला. पहिल्या अपघातापासून वाचवताना मयुरेशने दुसरा भीषण अपघात केला. त्यात दोघांचा जीव गेला.
चारचाकीचा वेग इतका होता की, दुचाकीवरून वडिलांसह चाललेली अॅड. भाग्यश्री गवळी व त्यांचे वडील दोघेही रस्त्यापासून बाजूला असलेले तारेच्या कुंपणावरून पलीकडे 15 ते 20 फूट लांब उडून पडले. वेगाने जाऊन झुडपात असणार्या दगडावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य दोघेजण दुचाकीसह चारचाकीखाली जाऊन अडकले.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील व्यावसायिक तसेच आजूबाजूच्या तरुणांनी धाव घेतली. मोटारीखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. जखमी जीवाच्या आकांताने ओरडत होते. जमावाने आलिशान मोटार जागेवर पलटी करून जखमींना बाहेर काढले. या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकाला बाहेर ओढून काढून त्याची बेदम धुलाई केली.
अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली. जखमींना खासगी रुग्णालयात हलविले. जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलिस अधिकार्यांनी चालक मयुरेश पाटील याला ताब्यात घेऊन तत्काळ राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणले.
या भीषण अपघातात तीन मोपेड आणि तीन मोटारसायकलचा चक्काचूर झाला. मोपेडचे स्पेअर पार्टस् तर परिसरात शंभर फुटांवर विखुरले होते. दुचाकीच्या सीटस् घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन पडल्या होत्या. या दुचाकींची अवस्था पाहून अपघाताची भीषणता दिसत होती.
अपघाताची माहिती मिळताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद केले होते. या ठिकाणी नागरिकांनाही जाऊ दिले जात नव्हते. दरम्यान पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी केली. जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली. मोटारचालक मयुरेश पाटील याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यांनी अद्याप काहीही माहिती दिली नाही. सायंकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल. प्राथमिक चौकशीत चालक मयुरेश पाटील याचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा हाच या अपघाताला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.
भीषण दुर्घटनेत गतप्राण झालेले दीपक सहदेव वंशे हे महापालिकेत आरोग्य विभागात कार्यरत होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. भाग्यश्रीने वकील व्हावे, ही त्यांची इच्छा होती. मुलीनेही बापाची इच्छा पूर्ण केली. दिलबहार तालीम मंडळाच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात कुटुंबीयांचा सहभाग असे. दीपक आणि त्यांची वकील मुलगीचा अपघातात मृत्यू झाल्याने रविवार पेठ, सणगर गल्ली, कसबा बावडा परिसरात शोककळा पसरली. रविवार पेठ येथील नागरिकांनी रुग्णालय व घटनास्थळ परिसरात गर्दी केली होती.
भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाग्यश्री गवळी, दीपक वंशे यांच्यासह जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळ, रुग्णालय परिसरात केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.