उमरगा (लातूर) : शंकर बिराजदार
आज माझ्या स्वप्नांची राख झाली, अतिवृष्टीने हिरवली माझ्या जगण्याची चाक. अश्रृंनाही आता थेंबांची उपमा नाही, कारण, माझ्या डोळ्यांत पाणीच उरले नाही....
उमरगा तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणि नुकसान यासाठी ही काव्यपंक्ती पुरेशी आहे. तालुक्यात हजारो हेक्टर शेती अक्षरशः जलमय झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सलग पाऊस, अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरवले.
दरम्यान सलग को-सळणाऱ्या पावसामुळे मुळज महसूल मंडळातील शेतशिवारात पाणीच पाणी झाले. शेत शिवारात अनेक ठिकाणचे बांध फुटून माती वाहून गेली, तर गावातील व्यंकट जोगदंड याच्या राहत्या घराचे संपूर्ण छत कोसळले, सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र अन्नधान्य, गृहोपयोगी साहित्य, लहान मुलांचे कपडे व शैक्षणिक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले, त्यामुळे संपूर्ण जोगदंड कुटुंब उघड्यावर आले आहे.
जोगदंड मुलाबाळांसह शेजारच्या घरात आश्रयाला असून वडिलांची आर्थिक परिस्थिती व घराचे नुकसान पाहून मुले शिक्षण सोडून देण्याच्या तयारीत आहेत. पावसामुळे शेतातील नुकसान कमी म्हणून की काय मधुकर मुगळे या शेतकऱ्यांच्या घराच्या इमल्याची पडझड झाली आहे. गावालगत दोन्ही बाजूंच्या ओढ्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे सकाळी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत गावात येता आलं नाही. अनेकांना शेतातील गोठ्यातच रात्र काढावी लागली. त्यामुळे मायबाप सरकारने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना दिलासा देण-जागून ारा निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चार दिवस झाले सारखा पाऊस सुरू आहे, पावसात खरीप पिकासह शेतजमीन खरडून गेली. शासनाने पंचानाम्याचे कागदी घोडे नाचवत बसू नये, सरसकट कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही.संजय बिराजदार, शेतकरी
दररोज मजुरी करून आई, वडील, पत्नी व दोन मुलाना सांभाळत आहे. सोमवारी रात्री घराचे सगळे छत कोसळले, मातीच्या ढिगाऱ्या खाली अन्नधान्य, गृहोपयोगी वस्तू, कपडे, मुलांच्या शाळेच्या वह्या, पुस्तके सगळी मातीखाली गेली आहे, मुलांनी शाळेत जायला नकार दिला आहे. तात्पुरती शेजारच्या घरात सोय झाली असली तरी कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने तातडीची आर्थिक मदत करावी.व्यंकट जोगदंड, मुळज
वडील रोज मजुरी करून आम्हाला शिकवत आहेत. मी दहावीत तर लहान भाऊ आठवीत आहे, पावसात काल रात्री सगळं घर पडलंय, माझे वह्या पुस्तक मातीखाली गेली आहेत. काल रात्री उपाशीपोटी झोपलो, तात्पुरतं दुसऱ्याच्या घरी राहत आहे. वह्या पुस्तकांसाठी वडिलांकडे पैसेच नाहीत, त्यामुळे वडिलांकडे पुस्तकं आणि नवीन कपड्यांचा हट्ट करणार नाही.मनीषा जोगदंड, विद्यार्थिनी