लातूर : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. सराईत गुन्हेगार, तसेच शहरातील ट्युशन एरियासह शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या, दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कार्यवाही करा, अंमली पदार्थांची विक्री आढळल्यास संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी (दि.20) अधिकार्यांना बजावले.
लातूर शहर व जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
पोलिसांनी शहरातील विविध भागांत अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर, सराईत गुन्हेगारांवर कारवाई करावी. शहरातील वसतिगृहे, ट्यूशन एरियासह इतर भागांत सातत्याने पोलिस गस्त सुरू करावी. जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला पायबंद करण्यासाठी पोलिस प्रशासनआणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम हाती घ्यावी. अंमली पदार्थ, नशा करण्यासाठी वापरली जाणारी औषधे याची जिल्ह्यात विक्री होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने मोहीम हाती घ्यावी. ज्या परिसरात अवैध दारू, अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास येईल, त्या क्षेत्राच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालमंत्री भोसले यांनी बजावले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह खासदार व आमदारांनी यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या. जिल्ह्यात एमपीडीए अंतर्गत कार्यवाही जलद गतीने करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील प्राचार्य, हॉस्टेल चालक यांच्या मदतीने शहरात लवकरच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मोहीम राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करा
बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या, अशी शस्त्रास्त्रे विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी. युवक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.