Goa News | केतन भाटीकरांच्या प्रवेशाबाबत पुष्टी करणे अमित पाटकरांनी टाळले

भाटीकर यांना विरोध असल्याचे पत्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पाठवले आहे
Goa News | केतन भाटीकरांच्या प्रवेशाबाबत पुष्टी करणे अमित पाटकरांनी टाळले
Published on
Updated on

पणजी/फोंडा : मगो पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास सज्ज झालेल्या डॉ. केतन भाटीकर यांना फोंड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनीच विरोध केल्यामुळे पुढे काय, असा सवाल निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही भाटीकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल पुष्टी करणे टाळले आहे.

पाटकर म्हणाले, भाटीकरांनी आमच्याशी संपर्क साधला आहे; मात्र याबाबत अंतिम निर्णय व्हायचे आहे. केतन भाटीकर यांच्याकडून प्रवेशाची पूर्ण तयारी झाली असली, तरी सोशल मीडियावर तसे पोस्ट फिरत असले, तरी स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आणि प्रदेशाध्यक्षांच्या संदिग्धतेने या पक्षप्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेस पक्षाचे फोंडा गटाध्यक्ष विलियम आगियार व इतरांनी केतन भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांना कोणतीच कल्पना न दिल्याने आम्ही विरोध करत असल्याचे सांगितले. भाटीकर यांना विरोध असल्याचे पत्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पाठवले आहे. त्यामुळे त्यावर काय निर्णय होतो, ते पाहावे लागेल. केतन भाटीकर यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश येत्या मंगळवारी फोंड्यात एका जाहीर कार्यक्रमात होणार आहे. त्यापूर्वी कार्यकर्त्यांची ही नाराजी दूर करण्यात येते की अन्य काय यासंबंधी लवकरच कळणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या मडगावातील एका कार्यक्रमात भाटीकर यांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयाबद्दल राज्यातील नेत्यांना जाब विचारला होता. त्यावर दोन दिवसांत फोंड्यात येऊन आपण कार्यकर्त्यांशी बोलू असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितल्याचे या कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रवेशाचा निर्णय विचाराधीन : पाटकर

केतन भाटीकरांनी जाहीर केलेला २४ तारखेचा पक्षप्रवेश, फोंड्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने असलेला विरोध याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना विचारले असता, डॉ. भाटीकरांनी पक्षाशी संपर्क साधला आहे; मात्र त्यावर एक-दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे सांगत त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल निःसंदिग्ध पुष्टी करण्यास नकार दिला.

आपला प्रवेश नक्की : भाटीकर

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर डॉ. केतन भाटीकर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी २४ रोजी आपला काँग्रेसमधील पक्षप्रवेश नक्की असल्याचे सांगितले. सर्व गोष्टी अगोदरच नक्की झाल्याचे ते म्हणाले.

भाटीकर यांचे स्वागत : राजेश वेरेकर

काँग्रेस पक्षात केतन भाटीकर यांचे आपण स्वागत करतो असे काँग्रेस पक्षाचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षावाढीसाठी कुणी पक्षात येत असेल तर आपण त्याचे स्वागतच करू असे सांगताना केतन आणि आपण मित्र आहोत, मात्र त्यांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे ती जाणून घ्यावी लागेल असे राजेश वेरेकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news