girl death pudhari photo
लातूर

Latur|उपचारातील निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू? डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

Latur| medical negligence death case- वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर कारवाई; तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून उदगीर येथील पीएमए हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. नागनाथ कवडगावे यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर येथील वैद्यकीय समितीने उपचारात हयगय झाल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञा प्रमोदकुमार नेत्रगावकर (वय २६, रा. नेत्रगाव, ता. उदगीर) यांना ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता देगलूर रोडवरील एलआयसी कार्यालयासमोरील पीएमए हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३३ वाजेपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. या काळात डॉक्टरांनी चुकीचा औषधोपचार करून उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे प्रतिज्ञा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे भाऊ प्रतीक्षित प्रमोदकुमार नेत्रगावकर (वय २३) यांनी फिर्यादीत केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, लातूर येथील वैद्यकीय अधिकारी समितीने रुग्णपत्रिका, वैद्यकीय कागदपत्रे आणि संबंधितांचे जबाब तपासले.

त्यानंतर दिलेल्या अभिप्रायात डॉक्टरांनी विहित वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार केल्याचे दिसून येत नसून उपचारात हयगय झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, रुग्णाच्या मृत्यूची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असतानाही ती न देता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भुसनूर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT