पिंपळवाडी ( लातूर ) : परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथे मंगळवारी (दि. २५) शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागली. ही घटना घडताच गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेचा तात्काळ वापर करून माहिती सर्वत्र पोहोचवण्यात आली आणि ग्रामस्थांनी वेळेवर दाखव-लेल्या तत्परतेमुळे जवळपास २० एकर ऊस आगीपासून बचावला.
रामचंद्र भीमराव खवाले, महारुद्र भीमराव खबाले, केशव गोरख खबाले, अर्जुन गोरख खबाले व तेजस नानासाहेब खबाले यांच्या शेतातील ऊसाला आग लागल्याचे समजताच सरपंच रुपेश काळे यांनी ग्रामसुरक्षा हेल्पलाइन १८००२७०३६०० वरून तत्काळ सूचना प्रसारित केल्या. सूचना मिळताच गावकरी काही क्षणांत घटनास्थळी दाखल झाले. आल्यानंतर या सर्वांनी आग फैलावत असलेल्या दिशेचा ऊस तातडीने हाताने मोडून टाकण्यास सुरुवात केली. पाचटही हातानेच दूर सारत आगीचा फैलाव रोखला गेला. सर्वांच्या एकजुटीची शक्ती आगीचा फैलाव रोखण्यास कामी आली. अशाप्रकारे सर्वांनी मिळून आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.
गावातील लोकांच्या जलद प्रतिसादामुळे आगीचा फैलाव रोखला गेला आणि मोठे आर्थिक नुकसान टळले. पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, अधिकारी आणि पोलीस पाटील यांच्या पुढाकारामुळे गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून आजवर या यंत्रणेचा १५ वेळा विविध सूचना व आपत्कालीन माहिती देण्यासाठी उपयोग झाला आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि तातडीच्या प्रतिसादामुळे एक मोठी दुर्घटना टळल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.