लातूर

Mahadbt portal technical issue | कृषीची महाडीबीटी पूर्वसंमती सेवा सहा महिन्यांपासून ठप्प...

११८४ शेतकरी अनुदानापासून वंचित, पूर्वसमंती सुरु करा, शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंबामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती सेवा तब्बल सहा महिन्यांपासून बंद असल्याने चाकूर तालुक्यातील ११८४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव रखडले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून महाडीबीटी अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड आदी योजनांसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करतात. मात्र लाभ मंजुरीपूर्वी आवश्यक असलेली पूर्वसंमतीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आवश्यक साहित्य खरेदी करता येत नाही. परिणामी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना कागदावरच राहिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक आणि तुषार संचासाठी चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. शासनाकडून ठिबकसाठी ७५ टक्के तर तुषारसाठी हेक्टरी १९ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेत ट्रॅक्टरसाठी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. मात्र पूर्वसंमती नसल्याने राज्यासह चाकूर तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.

चाकूर तालुक्यातील प्रलंबित प्रस्तावांची संख्या अधिक असून यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरणाचे ४१८, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचे ७६६ असे एकूण ११८४ एवढे शेतकरी सहा महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या महाडीबीटीवर पूर्वसंमती मिळाल्यास चाकूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या प्रस्तावांवर निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम डोळ्यासमोर ठेवून अर्ज केले आहे, मात्र त्या शेतकऱ्यांना महाडीबीटीची पूर्वसंमती न मिळाल्याने त्यांची आवश्यक साहित्य खरेदी रखडली आहे.

कृषी विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाने महाडीबीटीतील अडथळे दूर करून तातडीने पूर्वसंमती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी चाकूर तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान तालुका कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव यांच्याशी संपर्क केला असता शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर महाडीबीटीची पूर्वसमंती सुरु होईल असे सांगितले.

पूर्वसंमती कधी सुरू होणार ?

शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पूर्वसंमती सेवा नेमकी कधी सुरू होणार हा आहे. याबाबत शासन किंवा संबंधित कृषी विभागाकडून कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत चालली आहे.यामुळे शेतकरी पूर्वसमंतीच्या प्रतीक्षेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT