

कुडाळ : सरकार शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली करत असताना, कृषी विभागाचे अधिकारी नेमकं करतात काय? एसी केबिनमध्ये बसून योजना कागदावरच ठेवणार असाल, तर गाशा गुंडाळायला तयार राहा. शेतकऱ्यांची कामं आणि योजना त्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्याच पाहिजेत, अन्यथा कारवाईला सामोरे जा,अशा कडक आणि आक्रमक शब्दांत नीलेश राणे यांनी कुडाळ-मालवणच्या कृषी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
कुडाळ येथे आयोजित कृषी विभागाच्या खरीप आढावा बैठकीत आ. राणे यांचा 'रुद्रावतार' पाहायला मिळाला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली,जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याचा कणा मोडण्याचे पाप करू नका!
बैठकीच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती यात मोठी तफावत आढळल्याने नीलेश राणे संतापले. ते म्हणाले, सरकार कृषी विभागाला मोठा निधी देते कारण शेतकरी आमचा कणा आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी या कण्यालाच सुरुंग लावण्याचे काम करत आहेत. आंबा-काजू बागायतदारांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. ही कसली कार्यपद्धती? शेतकऱ्यांची आणि या सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, हे तुम्हाला महागात पडेल, असे ठणकावून सांगितले.
नुकसान भरपाईसाठी कोणाची वाट पाहता?
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यावरून आ.राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाऊस असो वा इतर नैसर्गिक आपत्ती, पंचनामे करण्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट बघता? कोणाच्या बापाची परवानगी हवी तुम्हाला? शासन आदेश स्पष्ट असताना शेतकऱ्यांच्या बांधावर का पोहोचत नाही ? असा सवाल त्यांनी केला. तसेच, गेल्या वर्षभरात खर्च झालेल्या सरकारी निधीची तातडीने 'श्वेतपत्रिका' काढण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.
ठराविक शेतकरीच तुमचे लाडके आहेत का?
प्रगतशील शेतकरी निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आ.राणे म्हणाले, कुडाळ आणि मालवणमध्ये शेकडो प्रगतशील शेतकरी असताना पुरस्कार फक्त ठराविक लोकांनाच कसे मिळतात? ही तुमची लाडक्यांची यादी बाजूला ठेवा आणि कष्टकरी शेतकऱ्याला न्याय द्या. तुमची ही मनमानी आता चालू देणार नाही, असे सांगितले.