Manjara dam water release
लातूर : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारपासून (दि.१५) सुरू असलेल्या पावसाने निम्न तेरणा प्रकल्प भरला आहे. धऱण पाणलोट क्षेत्रातून येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी (दि.१६) सकाळी सात वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे 1 ,14 7,8,6,9,4,11,3,12 अशी एकूण दहा वक्रद्वारे 10 सेंटिमीटर ने उघडण्यात आली होती. आता यातील सहा बंद करण्यात आली आहेत. मांजरा धरण ९० टक्के भरल्याने धरणाचे चार वक्रदारे ०.२५ मिटर उघडण्यात आली. मांजरा नदीत पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
धरण भरल्याने सकाळी निम्न तेरणा धरणातून 3806.56 क्युसेक (107.79 क्युमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे, कमी करण्याबाबत परिस्थितीजन्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास निम्न तेरणा धरणाची ३,४,६, ९,११ व १२ ही सहा दरवाजे बंद करण्यात आली.
उर्वरीत २,१३,७ व ८ या दरवाज्यातून १० सेंटीमीटरने १५२२.५६ क्युसेक (४३.११४ क्युमेक्स) असा विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिक, शेतकरी यांना सतर्क राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचा इशारा लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
औसा तालुक्यातील तावरजा नदी लगत परिसरात जोराचा पाऊस झाला असून तावरजा प्रकल्प ७३ टक्के भरला आहे. शुक्रवारी सायंकाळ पासून सुरू असलेल्या व शनिवारी पहाटे पर्यंत सुरू असलेल्या पावसाने भुसणी बंधारा भरला आहे. तथापि बंधाऱ्याची दारे न उघल्याने बंधाऱ्यालगत असलेल्या शेतात पाणी शिरले आहे. पिके, भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. गुरांच्या गोठ्यांत पाणी शिरले आहे. तर उसाचे फड आडवे झाले आहेत.